अर्थसंकल्प सादर करताना अजितदादांची शेरोशायरी

अर्थसंकल्प सादर करताना अजितदादांची शेरोशायरी

वित्तमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी विधानसभेत अर्थसंकल्प सादर करताना हिंदीतील श्रेष्ठ कवी दुष्यंतकुमार, मराठी गझलकर सुरेश भट यांच्या शब्दरचनेची पेरणी करत विरोधी पक्ष भाजपवर निशाणा साधला. अजितदादांच्या या काव्यप्रेमाने सभागृहातील दोन्ही बाजूच्या सदस्यांना आश्चर्याचा सुखद धक्का बसला. काँग्रेस आघाडी सरकारच्या काळातही अजितदादांनी अर्थमंत्री या नात्याने अर्थसंकल्प सादर केले आहेत. त्यावेळी गुलाबाचे फूल आणि शेरोशायरी अथवा कवितांचा आधार न घेता अजित पवारांनी अर्थसंकल्प मांडले आहेत. मात्र, आज महाराष्ट्र विकास आघाडीचा पहिला अर्थसंकल्प मांडताना अजितदादांना कविता, शेर म्हणून दाखवण्याचा मोह आवरला नाही.

भाजपवर शरसंधान साधताना पवारांनी सोहनलाल द्विवेदी यांच्या सुप्रिसध्द ‘कोशीश करनेवाले की हार नही होती’ या कवितेतील काही ओळी ऐकवल्या. ‘असफलता एक चुनौती है, इसे स्वीकार करो, क्या कमी रह गयी देखो और सुधार करो’ या ओळी वाचून दाखवल्या. पवारांनी ही कविता हरिवंशराय बच्चन यांची असल्याचे सांगितले. मात्र, प्रत्यक्षात या ओळी सोहनलाल द्विेवेदी यांच्या आहेत.


हेही वाचा – BUDGET 2020 : राज्यावर ४ लाख ३३ हजार ९०१ कोटींचं कर्ज!

एरवी फारसे हिंदी न बोलणाऱ्या पवारांनी अर्थसंकल्पीय भाषणात प्रसिध्द शायर अर्श मलसियानी यांचा शेर ऐकवला. ‘पुछ अगले बरस में क्या होगा, मुझसे पिछले बरस की बात न कर, ये बता हाल क्या है लाखो का, मुझसे दो-चार-दस की बात न कर’ त्यांच्या या शेरोशायरीला दोन्ही बाजूकडून दाद मिळाली.

विरोधकांवर टीका करताना अजित पवारांनी ‘कौन कहता है आसमाँ मै सुराग नही होता, एक पत्थर तो तबियत से उछालो यारो’ या दुष्यंतकुमाराच्या ओळी ऐकवल्या. सुप्रिसध्द कवी सुरेश भट यांच्या कवितेतील
‘हाच माझा देश, ही माझी माती,
येथले आकाशही माझ्याच हाती
आणला मी उद्याचा सूर्य येथे
लावती काही करंटे सांजवाती’
या ओळी सादर करून अजित पवारांनी अर्थसंकल्पीय भाषणाचा समारोप केला.

 

First Published on: March 6, 2020 11:09 PM
Exit mobile version