नाट्य परिषदेच्या निवडणुकीवरून शरद पवार म्हणाले….

नाट्य परिषदेच्या निवडणुकीवरून शरद पवार म्हणाले….

संग्रहित छायाचित्र

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकांचं बिगुल वाजलं असून हळुहळू याला राजकीय आखाड्याचं स्वरूप प्राप्त झालं आहे. राज्यात ज्या पद्धतीने राजकारणाचे वारे वाहत आहेत, तेच वारे आता अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकांमध्ये वाहू लागले की काय? अशी चर्चा जोरात सुरूये. कोणत्या पक्षाचा पाठिंबा कुणाला यावर अनेक तर्क वितर्क लावण्यात येत होते. परंतू यावर आता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्टीकरण दिलंय.

२०२४ ते २०२८ या काळासाठी विद्यमान पदाधिकाऱ्यांनी पुन्हा एकत्र येत ‘आपलं पॅनेल’ निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. मध्यवर्तीसाठी प्रसाद कांबळी पुन्हा निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. त्यांच्यासोबत सुकन्या मोने, मंगेश कदम, असे १४ उमेदवार या निवडणूकीच्या मैदानात उतरले आहेत. त्यांना टक्कर देण्यासाठी यंदा अभिनेते आणि निर्माते प्रशांत दामले यांचं ‘रंगकर्मी नाटक समूह’ या पॅनल उभं राहिलं आहे. ही निवडणूक अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची असली तरी राजकीय आखाडा बनून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरोधात शरद पवार असा रंगतो की काय अशी चर्चा सुरू होती. असं असेल तर मग कोणत्या पक्षाचा पाठिंबा कुणाला असेल, यावर चर्चा रंगू लागल्या होत्या.

शरद पवार यांनी यावर एक ट्वीट शेअर केलं आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची पंचवार्षिक निवडणूक येत्या १६ एप्रिल रोजी पार पडणार आहे. परिषदेचा तहहयात विश्वस्त या नात्यानं निष्पक्षपाती राहून कोणत्याही पॅनेलला पाठिंबा जाहीर न करण्याची माझी भूमिका आहे, असं शरद पवार यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे. त्यांनी दोन्ही पॅनलच्या उमेदवारांना शुभेच्छा दिल्या आहेत.

निवडणुकीसाठी 16 एप्रिल 2023 रोजी मतदान प्रक्रिया होणार आहे. मतदानाची वेळ सकाळी 9.30 ते सायंकाळी 5.30 अशी आहे. यंदाच्या निवडणुकी साठी दोन्ही गटांकडून योजना आणि कार्यांची मोठी यादी दिली गेली आहे.

First Published on: March 28, 2023 8:51 PM
Exit mobile version