गडकरी, कोंडदेवांचा पुतळा पुन्हा बसवा – आनंद दवे

गडकरी, कोंडदेवांचा पुतळा पुन्हा बसवा – आनंद दवे

नाटककार राम गणेश गडकरी आणि दादोजी कोंडदेव यांच्या पुतळ्यावरून पुण्यातील राजकारण पुन्हा एकदा तपासण्याची शक्यता आहे. राम गणेश गडकरी आणि दादोजी कोंडदेव या दोघांचे पुतळे पुणे पालिकेनं पुन्हा बसवा, तेही लवकरात लवकर अशी मागणी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे आनंद दवे यांनी केली आहे. संभाजी बागेतील राम गणेश गडकरी यांचा पुतळा आणि लाल महालातील दादोजी कोंडदेव यांच्या पुतळ्यावरून वाद झाला होता. संभाजी ब्रिगेडनं दादोजी कोंडदेव हे संभाजी महाराजांचे गुरू नव्हते असा आक्षेप घेतला होता. त्यानंतर लाल महालातील दादोजी कोंडदेव यांच्या पुतळ्यावरुन वाद देखील झाला. त्यानंतर तो पुतळा रात्रीच हटवला गेला. शिवाय, संभाजी बागेतील राम गणेश गडकरी यांचा पुतळा देखील दोन वर्षांपूर्वी  हटवला गेला होता. त्यावरून पुण्यातील वातावरण देखील तंग झालं होतं. पण, आता राम गणेश गडकरी आणि दादोजी कोंडदेव यांचा पुतळा पुणे पालिकेने लवकर बसवावा अशी मागणी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे आनंद दवे यांनी केली आहे. पुणे महापालिकेनं भारतीय ब्राह्मण महासंघाच्या मागणीची दखल न घेतल्यास कायदेशीर मार्गाने लढा देऊन पुतळे स्वतःच्या खर्चाने पुतळे बसवू असा इशारा दिला आहे. त्यामुळे आता पुण्यातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे. यावर पुणे पालिकेनं अद्याप तरी आपली कोणतीही भूमिका स्पष्ट केलेली नाही.

First Published on: November 23, 2018 5:11 PM
Exit mobile version