मालेगाव शहरातील सर्व पूल पाण्याखाली; ३०० कुटुंबांचे स्थलांतर

मालेगाव शहरातील सर्व पूल पाण्याखाली; ३०० कुटुंबांचे स्थलांतर

शहर व परिसरात मंगळवारी (६ ऑगस्ट) पावसाने उघडीप दिली. सोमवारी रात्री शहरातील सर्व पुलांवरुन पाणी वाहत होते. गाळाचे पाणी शहरातील प्रमुख रस्त्यांवर आल्याने प्रचंड गाळ साचला. यामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले. मात्र, दिवसभर उगमस्थानात पाऊस सुरू असल्याने पाण्याने धोक्याची पातळी ओलांडली.

गिरणा मोसम खोर्‍यातील चणकापूर व हरणबारी, केळझर, ठेंगोडा धरणक्षेत्रात झालेल्या धुंवाधार पावसामुळे गिरणा नदीतील पूरस्थिती कायम आहे. मालेगाव शहरातील मोसम आणि गिरणा नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात रविवारी सायंकाळी आठच्या सुमारास वाढ झाल्याने नदीवरील रामसेतू पुलासह शरतील सर्व पुलाच्या वरून पाणी वाहत होते. नागरिकांनी पाणी पाहण्यासाठी गर्दी केल्याने जत्रेचे स्वरूप आले होते. पूल पाण्याखाली गेल्याने धोक्याची पातळी ओलांडली आहे. नागरिकांनी पाण्याजवळ जाऊ नये असे आवाहन केले आहे. १९६९ नंतर प्रथमच मोसम नदीस मोठ्या प्रमाणावर पूरपाणी आले आहे. संगमेश्वर रस्त्यावरील नदीस लागून असलेल्या घरे व दुकानात पाणी शिरले आहे. किल्ला भागातील नदी किनारी असलेल्या घरांमध्येही पाणी घुसले आहे. त्यामुळे जवळपास ३०० कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आली आहे.

मंगळवारीही शहर परिसरात कमी अधिक प्रमाणात दिवसभर संततधार होती. अशीच स्थिती तालुक्यातील झोडगे, दाभाडी, करंजगव्हाण परिसरात असल्याने पावसाने सर्वदूर हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले. गिरणा नदीपाठोपाठ शहराच्या मध्यातून वाहणार्‍या मोसम नदीला देखील पूर आल्याने पुराचे पाणी वैतागवाडी पूल, कॅम्प बंधारा, द्याने सांडावा पूल, होळकर पूल, सांडावा पूल, रामसेतू हे पाण्याखाली गेले. गिरणा नदीतील पूरस्थिती कायम असून चणकापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढल्याने पाणीपातळीत वाढ झाली आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पालिकेचे अग्निशमन अधिक्षक संजय पवार यांच्यासह आपत्कालीन विभागाचे अधिकारी कर्मचारी नदीपात्रालगत उभे राहून नागरिकांना सतर्क राहण्याचा सूचना देत होते.

First Published on: August 6, 2019 7:44 PM
Exit mobile version