Ratnagiri Curfew: रत्नागिरीत अत्यावश्यक सेवेसह सर्व दुकाने बंद

Ratnagiri Curfew: रत्नागिरीत अत्यावश्यक सेवेसह सर्व दुकाने बंद

लॉकडाऊन

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला थोपवण्यासाठी महाराष्ट्र राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मात्र, तरी देखील काही ठिकाणी या नियमांचे पालन करत नसल्याचे दिसून येत आहे. याच पार्श्वभूीवर आता रत्नागिरीत कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. आता रत्नागिरी तालुक्यात अत्यावश्यक सेवेसह सर्व दुकाने बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता रत्नागिरीत किराणा, भाजी आणि दूध घरपोच पोहोचवले जाईल. तसेच आता जर दुकाने सुरु ठेवली तर त्या दुकानांवर कारवाई केली जाईल, असा इशारा रत्नागिरीच्या तहसीलदारांनी दिला आहे.

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी १४ एप्रिलपासून राज्यात कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. मात्र, कडक निर्बंध असताना देखील राज्यातील काही ठिकाणी नियमांचे उल्लंघन करण्यात आले होते. याच पार्श्वभूमीवर आता रत्नागिरी तालुक्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. गेल्या दोन ते तीन दिवसात रत्नागिरीत मोठ्या संख्येने कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत वाढ झालेली पाहायला मिळाली. गेल्या दोन दिवसांचा आकडा पाहिला तर ४०० च्यावर असून यातील सर्वात अधिक रुग्ण हे रत्नागिरी तालुक्यातील आहेत.

गेल्या २४ तासांत रत्नागिरीत ४०६ रुग्ण आढळून आले. त्यातील दीडशे रुग्ण हे रत्नागिरी तालुक्यातील असल्याचे समोर आले आहे. रत्नागिरीच्या ग्रामीण भागात कडक निर्बंधाचे पालन केले जात आहे. मात्र, शहरी भागात याचे पालन केले जात नसल्याचे दिसून येत आहे. लोक मेडिकल, भाजीपाला आणि किराणा आणायला जात असल्याचे कारण देत घराबाहेर पडत आहेत. त्यामुळेच आता रत्नागिरीत कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे तहसीलदारांनी अत्यावश्यक सेवेसह सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता नागरिकांना हेल्पिंग हँडच्या मदतीने किंवा सामाजिक संस्थेच्या मदतीने सेवा घरपोच देण्यात येणार आहे.


हेही वाचा – नाशिक जिल्ह्यातील २६ हजार मजूर सरकारी मदतीपासून वंचित


 

First Published on: April 16, 2021 3:46 PM
Exit mobile version