भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेनेसोबत आघाडी -शरद पवार

भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेनेसोबत आघाडी -शरद पवार

शरद पवार

भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेनेसोबत राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी केली तरीही चालेल; पण भाजप सत्तेत नको, असे अल्पसंख्याकांचे म्हणणे असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले. शिवसेनेसोबत आघाडी करण्याआधी आम्ही त्यावर बराच खल केला. महाराष्ट्रासोबतच उत्तर प्रदेश, बिहार, दिल्लीतूनही जनभावना जाणून घेतल्या. त्यात अल्पसंख्याक समाजाकडून या आघाडीचे स्वागत करण्यात आले.

शिवसेनेसोबत राष्ट्रवादीची आघाडी होण्यास व ती दीर्घकाळ पुढे नेण्यास आमची काहीच हरकत नाही, असा सूर अल्पसंख्याकांमधून निघाला. शिवसेनेसोबत आघाडी करताना भाजपला मात्र तुम्ही कोणत्याही परिस्थितीत सत्तेपासून दूर ठेवा, असे सर्वांचेच म्हणणे होते, असेही पवार यांनी पुढे नमूद केले.राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात आयोजित राष्ट्रवादी अल्पसंख्याक सेलचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीत पवार बोलत होते.

ते म्हणाले की, पाच वर्षांपूर्वीची देशातील स्थिती आणि भाजपचे सरकार आल्यानंतरची स्थिती याचा विचार करण्याची गरज आहे. आज देशात कुठेही गेल्यास लोक महाराष्ट्राची स्तुती करतात. महाराष्ट्राने आम्हाला नवी दिशा दाखवली आहे आणि त्या दिशेने आम्ही मार्गक्रमण करणार आहोत, असे सांगितले जाते. ही बाब आपल्याला प्रेरणा देणारी असून आपण आपली विचारधारा अधिक मजबूत करण्यासाठी येत्या काळात पावले उचलायला हवीत, असे पवार यांनी पुढे सांगितले.

काँग्रेससह राष्ट्रवादी काँग्रेसने सीएए आणि एनआरसीला विरोध केला आहे. तसेच, या दोन्ही कायद्यांविरोधातील आंदोलनातही राष्ट्रवादीने सहभाग घेतला आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड हेही मुंबईतील आंदोलनात सहभागी झाले होते. शरद पवार यांनीही याबाबत पक्षाची भूमिका स्पष्ट केली. तसेच, आपल्या देशात भटका समाज आहे, त्यांना नागरिकत्व मिळेल का? असा सवाल पवार यांनी केला आहे.

केंद्र सरकारचे आज समाजातील मागास वर्गाकडे लक्ष नाही. या वर्गासाठी परिवर्तन करण्याचे काम आपण केले पाहिजे. ज्यांच्या हाती देशाची सत्ता आहे ते ठराविक समाजाचा विचार करून निर्णय घेण्याचे काम करत आहेत. बहुसंख्य लोकांना याची जाणीव नाही. क्रिकेट क्षेत्रात काम करत असताना मी पाकिस्तानमध्ये बैठकीला गेलो होतो. तेव्हा असे अनेक लोक मला भेटले की त्यांचा एकतरी नातेवाईक भारतात आहे. त्यांची मनापासून इच्छा आहे की, त्यांच्या नातेवाईकांसोबत भेटीगाठी व्हाव्यात. पण केवळ ते मुस्लीम आहेत म्हणून त्यांना भारतात येण्यास परवानगी नाही, असे पवार यांनी सांगितले.

जनगणनेत प्रत्येकाच्या जन्माची नोंद करण्याचा निर्णय होत आहे. जन्म झालेल्या गावाची देखील नोंद होईल असे पाहण्यात येत आहे. पण जो भटका समाज आहे त्याच्या जन्माची कोणती नोंद असेल का? त्याला भारतीय नागरिकत्व मिळेल का? असा प्रश्नही पवार यांनी उपस्थित केला आहे. तसेच, असे न झाल्यास त्या नागरिकांवर अन्याय होणार आहे.

First Published on: January 24, 2020 7:05 AM
Exit mobile version