भ्रष्टवादी पक्षांबरोबर सत्तेसाठी भाव करत नाही, अमेय खोपकरांचं आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर

भ्रष्टवादी पक्षांबरोबर सत्तेसाठी भाव करत नाही, अमेय खोपकरांचं आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज ठाण्यात उत्तरसभा होणार आहे. राज ठाकरे यांची गुढीपाडव्यानिमित्त मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये सभा झाली. यामध्ये त्यांनी भाजपचं कौतुक करत सत्ताधारी पक्षावर टीका केली. परंतु त्यांनी हनुमान चालीसा मशिदीसमोर लावण्याच्या भोंग्यावरून वक्तव्य केल्यानंतर राजकीय पक्षातील नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली. तसेच अनेक क्षेत्रातून टीका देखील झाली. त्यालाच उत्तर देण्यासाठी आज ठाण्यात राज ठाकरेंची उत्तरसभा आयोजित करण्यात आली आहे. दरम्यान, भ्रष्टवादी पक्षांबरोबर सत्तेसाठी भाव करत नाही अशी, टीका मनसेच्या चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी केली.

रामनवमीचं औचित्य साधून मनसेनं शिवसेनेवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी त्यांचा भोंगा जप्त केला आणि मनसैनिकांना ताब्यात घेतलं. या सगळ्या प्रकारानंतर राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मनसेला खोचक प्रत्युत्तर दिलं. संपलेल्या पक्षाला मी उत्तर देत नाही, असा टोला आदित्य ठाकरेंनी लगावला. स्टंटबाजीला मी भाव देत नाही, असंही यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले होते. यावरून आता अमेय खोपकर यांनी आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं आहे.

कुमार आदित्यजी ठाकरे, आम्ही राजसाहेबांचे मनसैनिक…जनतेशी निष्ठा संपलेल्या पक्षाला आम्ही किंमत देत नाही आणि तुमच्यासारखे भ्रष्टवादी पक्षांबरोबर सत्तेसाठी भाव करत नाही, असं ट्विट अमेय खोपकर यांनी केलं आहे.

उत्तरसभा म्हणजे हिशेबाचा दिवस, आज राजसाहेब करारा जवाब देणार आज ठाण्यात राजगर्जना घुमणार,आणि भ्रष्टवादी महाखिचडीची तंतरणार, असं ट्विट अमेय खोपकर यांनी केलं आहे.

राज ठाकरेंची आज सायंकाळी ६.३० वाजता ठाण्यातील गडकरी रंगायतन सर्कल येथे जाहीर सभा होणार आहे. सभेच्या आधी दोन टीझरही मनसेकडून जाहीर करण्यात आले आहेत. आज होणाऱ्या सभेसाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. अधिकारी आणि कर्मचारी मिळून ४०० पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.


हेही वाचा : लाव रे तो व्हिडिओ विसरले का म्हणणाऱ्यांना राज ठाकरे आज उत्तर देतील – संदीप देशपांडे


 

First Published on: April 12, 2022 8:58 AM
Exit mobile version