डॉक्टरांची कमतरता भासल्यास कंत्राटी पदे भरणार – अमित देशमुख

डॉक्टरांची कमतरता भासल्यास कंत्राटी पदे भरणार – अमित देशमुख

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयामध्ये काम करणारे डॉक्टर, परिचारिका, आरोग्य सेवक, पॅरामेडिकल कर्मचारी यांना ओमायक्रॉन विषाणूची बाधा होताना दिसत आहे. त्यामुळे डॉक्टर अथवा पॅरामेडिकल कर्मचाऱ्यांची कमतरता भासल्यास कंत्राटी पद्धतीने मनुष्यबळ भरले जाईल, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी गुरुवारी दिली.

राज्यात कोरोनचा वाढता प्रादुर्भाव आणि वैद्यकीय शिक्षण विभाग करत असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी देशमुख यांनी आज बैठक घेतली. बैठकीत शासकीय रुग्णालय आणि महाविद्यालयात उपलब्ध असलेल्या पायाभूत सुविधा, ऑक्सिजनचा साठा, उपलब्ध असलेल्या व्हेंटिलेटर्सची संख्या, रेमडेसिव्हीरची उपलब्धता, रुग्णांची संख्या कमी करण्यासाठी उपाययोजना, गरज पडल्यास अतिरिक्त डॉक्टर्सची उपलब्धता अशा विविध विषयांचा आढावा घेण्यात आला.

या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना डॉक्टर आणि पॅरामेडिकल कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होत असल्याने केंद्र सरकारच्या सूचनेनुसार त्यांना तातडीने बुस्टर डोस देण्याचे नियोजन करण्याची सूचना अधिष्ठात्याना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात राहण्यासाठी सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयांच्या अधिष्ठातांनी आवश्यक ती पूर्वतयारी करावी. आवश्यक त्या उपाययोजना करण्यारबरोबरच सज्ज राहून इतर संबंधित विभागांबरोबर समन्वयाने काम करावे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयांमध्ये औषधांचा पुरेसा साठा ठेवणे, उपचारासाठी आवश्यक असणाऱ्या अत्यावश्यक औषधांचा तुटवडा होऊ नये, त्याचा पुरवठा सुरळीत सुरु रहावा याची दक्षता घ्यावी. आवश्यक त्या सोईसुविधा, ऑक्सिजनची उपलब्धता, व्हेंटिलेटर्सची संख्या यांच्यासह तांत्रिक साहित्य तयार ठेवावे. डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना संरक्षणात्मक साधने उपलब्ध करुन देणे, आरोग्य यंत्रणेत आवश्यक मनुष्यबळासंदर्भात आढावा घेऊन त्यासंदर्भात नियोजन करावे, अशा सूचना देशमुख यांनी दिल्या.

कोरोना रुग्णाला नातेवाईकाची सोबत

कोरोना रुग्ण रुग्णालयात दाखल झाल्यानंतर रुग्णाबरोबरच केवळ एकच नातेवाईकाला बरोबर राहण्याची परवानगी देण्यात येणार आहे, अशी माहिती देशमुख यांनी दिली. कोरोनाची गंभीर लक्षणे असणाऱ्या रुग्णांना रुग्णालयात बेडची उपलब्धता व्हावी तसेच रुग्णावर उपचारांसह देखभालीसाठी कोविड सेंटर, कोविड हेल्थ सेंटर आणि कोविड रुग्णालये सज्ज ठेवण्यात यावीत. कोविडचा संसर्ग होण्याचे प्रमाण वाढत असल्याने व्हेंटिलेटर्स, सीटी स्कॅन मशीन, एमआरआय मशीन्स, ऑक्सिजन मशिन्स सर्व सुस्थितीत आहेत किंवा नाही याची सुध्दा चाचपणी तातडीने करुन घ्यावी, अशा सूचनाही अमित देशमुख यांनी बैठकीत दिल्या.


हेही वाचा – Maharashtra Corona Update: टेन्शन वाढले! राज्यातील सक्रीय रुग्णसंख्या १ लाख पार; २४ तासांत ३६,२६५ रुग्णांची भर

First Published on: January 6, 2022 9:16 PM
Exit mobile version