श्रीसदस्यांच्या जाण्यानं माझं मन जड झालंय, अमित शाहांनी व्यक्त केल्या संवेदना

श्रीसदस्यांच्या जाण्यानं माझं मन जड झालंय, अमित शाहांनी व्यक्त केल्या संवेदना

नवी मुंबईतील खारघर येथे पार पडलेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याला गालबोट लागलं आहे. या सोहळ्यात उपस्थित असलेल्या आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या श्रीसदस्यांचा उष्माघात झाला. या कार्यक्रमात उष्माघातामुळे मृत्यू पावलेल्या श्रीसदस्यांचा आकडा १२ पर्यंत पोहोचला आहे. या घटनेवरून राजकारण चांगलंच तापलं असून राजकीय वर्तुळातून विविध प्रकारच्या प्रतिक्रिया समोर येत आहे. यावेळी श्रीसदस्यांच्या जाण्यानं माझं मन जड झालंय, असं ट्विट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी करत संवेदना व्यक्त केल्या आहेत.

काय म्हणाले अमित शाह?

काल झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याला उपस्थित असताना उष्माघाताने प्राण गमावलेल्या श्रीसदस्यांच्या जाण्याने, माझे मन जड झाले आहे. मृतांच्या कुटुंबियांप्रती मी संवेदना व्यक्त करतो. जे लोक उपचार घेत आहेत ते लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी मी प्रार्थना करतो, असं अमित शाह ट्विटद्वारे म्हणाले.

दरम्यान, खारघर येथील सोहळ्याची जय्यत तयारी महाराष्ट्र शासनाकडून करण्यात आली होती. जवळपास ३५० एकर जागेवर काही लाख श्री सदस्य मागील तीन दिवसांपासून या ठिकाणी राज्यातील विविध भागांतून दाखल झाले होते. या घटनेत जवळपास ३५० पेक्षा जास्त जणांना वेगवेगळ्या ठिकाणी उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. यापैकी काहींना प्राथमिक उपचार देऊन सोडण्यात आले आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून मृतांना श्रद्धांजली

आज सकाळी ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान सोहोळ्यात सहभागी ११ श्रीसदस्यांचा उष्माघातामुळे मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आणि वेदनादायी आहे. मी या साधकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाख रुपये मदत राज्य सरकारमार्फत देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. जे लोक उपचार घेत आहेत, त्यांच्या उपचाराचा खर्च राज्य सरकार करेल. त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होवो, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. स्वतः मुख्यमंत्र्यांनी रुग्णालयाला भेट देत माहिती घेतली आणि डॉक्टरांना योग्य त्या सूचना दिल्या आहेत. प्रशासन संपूर्ण समन्वय ठेवून असून वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आम्ही सातत्याने संपर्कात आहोत.


हेही वाचा : महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यास आलेल्या ११ जणांचा उष्माघाताने मृत्यू; मुख्यमंत्री शिंदेंची माहिती


 

First Published on: April 17, 2023 3:09 PM
Exit mobile version