एकाच कुटुंबाच्या तीन पिढ्या समाजसेवेचा संस्कार जपताना पहिल्यांदा पाहिलं- अमित शाह

एकाच कुटुंबाच्या तीन पिढ्या समाजसेवेचा संस्कार जपताना पहिल्यांदा पाहिलं- अमित शाह

पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आज महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. नवी मुंबईतील खारघरच्या सेंट्रल पार्क मैदानात हा भव्य पुरस्कार सोहळा पार पडतोय. जवळपास ४०० एकरचे हे मैदान श्री सदस्यांच्या गर्दीने भरलेला दिसून येत आहे. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या कार्याचं कौतूक करताना हे उद्गार काढले.

नवी मुंबईतील खारघरमधल्या सेंट्रल पार्कच्या जवळपास ४०० एकर मैदानात हा भव्य पुरस्कार सोहळा संपन्न झाला. असा न भूतो, न भविष्यती असा कार्यक्रम व्हावा या हेतून जय्यत तयारी करण्यात आली होती. सकाळपासूनच श्री सदस्यांनी सेंट्रल पार्कच्या मैदानावर येण्यास सुरूवात केली. राज्यभरातून वेगवेगळ्या जिल्ह्यातून बसमधून श्री सदस्य सेंट्रल पार्कच्या मैदानावर आले. खारघर शहरात पोलिसांचा बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. या सोहळ्यासाठी ४०० एकरच्या या भव्य मैदानात जवळपास ११० मोठ्या स्क्रिन बसवण्यात आल्या आहेत.

पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या पुरस्कार सोहळ्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, खासदार श्रीकांत शिंदे यांच्या इतर मंत्री आमदार आणि खासदार उपस्थित होते. जवळपास २० लाखांहून अधिक श्रीसेवकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.

यावेळी भाषण करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एवढी गर्दी मी कधीच पाहिली नसल्याचे मत व्यक्त केलं. “मी केवळ डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या सन्मानासाठी मी आलो आहे. प्रसिद्धीची आकांक्षा न ठेवता समासेवा करणाऱ्या एका समाजसेवकाच्या सन्मानासाठी इतका मोठा जनसारग लोटलेला मी यापूर्वी कधी पाहिला नव्हता. ४२ अंश तापमानाच्या या तळपत्या उन्हात इतक्या मोठ्या संख्येने बसलेले ही जनता आप्पासाहेबांवरील प्रेमाचं दर्शन घडवते. हा सन्मान त्याग आणि समर्पणातूनच मिळतो. हा सन्मान आप्पासाहेबांची शिकवण, कर्तुत्व, विश्वास, प्रेमाचा सन्मान आहे. गर्दीच्या मागे पळू नका. असं काहीतरी करा की गर्दी तुमच्या मागे येईल असं म्हणतात. परंतू हे आप्पासाहेबांनी प्रत्यक्षात करून दाखवलंय. लाखो लोक आप्पासाहेबांच्या सन्मान सोहळ्यासाठी इतक्या मोठ्या प्रमाणात गर्दी करून बसलेले आहेत.”, असे गौरवौद्गार यावेळी अमित शाह यांनी काढले.

आतापर्यंत एकाच कुटुंबावर कित्येक पिढीपर्यंत लक्ष्मीची कृपा असलेली मी पाहिलं. एकाच कुटुंबात कित्येक वीर जन्म घेत असल्याचं पाहिलं, एकाच कुटुंबावर सरस्वतीची कृपाही असलेलं पाहिलं. पण समाजसेवेचा संस्कार तीन पिढ्यांपर्यंत असलेले मी पहिल्यांदा पाहिलं आहे, अशी भावना यावेळी अमित शाह यांनी व्यक्त केली. आधी नानासाहेब, नंतर आप्पासाहेब आणि आता सचिन हे या समाजसेवेचे संस्कार पुढे नेत आहेत. आप्पासाहेबांनी समाजात निरुपणाच्या माध्यमातून सकारात्मकता आणली असल्याचं देखील अमित शाह यांनी सांगितलं. नानासाहेब आणि आप्पासाहेबांनी या सामाजिक चेतनेला जागृत करण्याच कार्य केलं असल्याचं अमित शाह यांना सांगितलं.

महान छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पुण्यभूमीने देशाला तीन मार्ग दाखविले. राष्ट्रासाठी जीवन अर्पण करण्याचा वीरतेचा मार्ग छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरू केला. स्वातंत्र्यवीर सावरकर, चाफेकर बंधू, आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके, लोकमान्य टिळकांनी स्वराज्य, सन्मानासाठी आपले जीवन अर्पिले. संतपरंपरेचा अध्यात्मिक मार्ग हा दुसरा मार्ग या भूमीने दिला आहे. समर्थ रामदास, संत तुकाराम महाराजापासून नामदेवांपर्यंत या सर्वांनी महाराष्ट्रातील भक्तीच्या, अध्यात्माच्या मार्गाचे देशाचे नेतृत्व करण्याचे काम केले आहे. सामाजिक चेतनेचा तिसऱा मार्गही येथूनच सुरू झाला. तसेच महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अशा अनेक सामाजिक आंदोलनाचे जनक महाराष्ट्राची भूमी आहे. ही सामाजिक चेतना जागृत करण्याचे व ती पुढे नेण्याचे काम आज नानासाहेब, आप्पासाहेबांनी सुरू ठेवली आहे.
समाजासाठी, दुसऱ्यांसाठी जगण्याची शिकवण देण्याचे काम या भूमीने केले आहे. कर्तृत्वाने दिलेली शिकवण चिरंजीव राहते. समाजासाठी, दुसऱ्यांसाठी, बांधवांसाठी काम करण्याची शिकवण आप्पासाहेबांनी दिली आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊनच भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले असल्याचेही श्री. शहा यांनी यावेळी सांगितले.
धर्माधिकारी कुटुंबियांनी आपल्या कर्तृत्वाने समाजामध्ये सुधारणा केली. मुलांसाठी शिक्षण, वृक्षारोपण, स्वच्छता, रक्तदान, जलसिंचन, विहिरींची सफाई, महिला सशक्तीकरण, व्यसनमुक्त समाज अशा विविध क्षेत्रात आप्पासाहेबांनी मोलाचे कार्य केले आहे.

केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील, रायगडचे पालकमंत्री उदय सामंत, ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, खासदार श्रीरंग बारणे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार प्रशांत ठाकूर, राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, धर्माधिकारी प्रतिष्ठानचे डॉ. सचिन धर्माधिकारी, उमेश धर्माधिकारी आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

First Published on: April 16, 2023 1:27 PM
Exit mobile version