‘करोडपती’ मनाचा महानायक; लोकबिरादरी प्रकल्पाला दिली आर्थिक मदत

‘करोडपती’ मनाचा महानायक; लोकबिरादरी प्रकल्पाला दिली आर्थिक मदत

अमिताभ बच्चन (प्रातिनिधिक फोटो)

बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या सोनी टीव्हीवरील ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमामध्ये या आठवड्यात कर्मवीर या खास शोकरता महाराष्ट्राचे मानबिंदू डॉ. प्रकाश बाबा आमटे आणि डॉ. मंदाकिनी आमटे या समाजसेवक जोडीने उपस्थिती दर्शवली होती. आपल्या लोक बिरादरी प्रकल्पाच्या विकासासाठी त्यांनी या खेळातून २५ लाख रुपये जिंकले. या दोन व्यक्तीमत्त्वाच्या कर्तृत्वाचे भारावलेले बिग बी अमिताभ बच्चन यांनी लोक बिरादरी प्रल्कपाच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या कार्यासाठी २५ लाख रुपयांची देणगी दिली आहे. हा कार्यक्रम झाल्यानंतर त्यांनी स्वतःच्या वतीने ही देणगी प्रकल्पासाठी देत असल्याचे सांगितले. तसेच महारोगी सेवा समिती वरोरा द्वारा संचालित लोक बिरादरी प्रकल्पाच्या खात्यात स्वतःचे २५ लाख रुपये जमा केले. स्वतःच्या देणगीचा त्यांनी ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमात जाहीर उल्लेख केला नाही, हे विशेष.

डॉ. प्रकाश आमटे, डॉ. मंदाकिनी आमटे आणि अमिताभ बच्चन केबीसीच्या सेटवर

डॉ. आमटे यांनी मानले आभार 

डॉ. प्रकाश आमटे यांनी प्रकल्पातर्फे अमिताभ बच्चन यांचे फेसबुक पोस्टच्या माध्यमातून आभार मानले आहे. डॉ. आमटे म्हणाले, “कौन बनेगा करोडोपती’ या कार्यक्रमामुळे लोक बिरादरी प्रकल्पाचे काम अजून दूरवर जाऊन पोहोचले आहे. महाराष्ट्रा बाहेरच्या राज्यातील जनतेपर्यंत हे कार्य पोहोचले आहे. गडचिरोली जिल्ह्यात यापुढे संपूर्ण भारतातून जनता भेट द्यायला येईल अशी अपेक्षा आहे. लोक बिरादरी प्रकल्पावर नितांत प्रेम करणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यातील नागरिक व तसेच सर्व भारतातील जनतेचे आम्ही ऋणी आहोत. तुम्हा सर्वांच्या पाठिंब्याने आमचा काम करण्याचा उत्साह द्विगुणित होत असतो. या दुर्गम भागात सुसज्य दवाखान्यात चांगली आरोग्य सेवा, दर्जेदार शिक्षण, पर्यावरण व वन्यजीव संरक्षण, बांबू हस्तकला, पाण्यासाठी गावागावात मोठे तलाव आणि गाव विकास अशा कार्यातून या भागातील आदिवासी बांधवांचा विकास साधण्याचा आम्ही ध्येयाने प्रेरित असलेल्या कार्यकर्त्यांच्या साथीने निरंतर प्रयत्न करीत आहोत आणि करीत राहणार. गेल्या ४५ वर्षात प्रकल्प निर्मितीत हजारो लोकांनी आर्थिक सहभाग दिला आहे. त्याशिवाय एवढे काम उभे करणे अवघड झाले असते. सर्व दात्यांचे आभार. लोक बिरादरी प्रकल्पातील सर्व कार्यकर्त्यांचे योगदान भरीव आहेच. आणि हे कार्य म्हणजे एक टीम वर्क आहे. असे नमूद करून कार्यकर्ते, देणगीदार, शुभचिंतक, पत्रकार बांधव, आदिवासी बांधव यांच्या मिश्रणाने हा प्रकल्प उभा राहिला आहे,’ अशा सर्वांचेच डॉ. आमटे यांनी आभार मानले.

First Published on: September 9, 2018 7:52 PM
Exit mobile version