माझी भावना उद्धव ठाकरेंसोबत पण..,धैर्यशील मानेंची ऑडिओ क्लिप व्हायरल

माझी भावना उद्धव ठाकरेंसोबत पण..,धैर्यशील मानेंची ऑडिओ क्लिप व्हायरल

शिवसेनेतील आमदारांमध्ये फूट पडल्यानंतर आता लोकसभेतील खासदारही बंडखोरी करत शिंदे गटात सामील होण्याच्या मार्गावर आहेत. कोल्हापूर लोकसभा मतदार संघातील खासदार संजय मंडलिक यांनी कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव शिंदे गटात प्रवेश केल्याचं म्हटलं आहे. परंतु मंडलिक यांच्यानंतर खासदार धैर्यशील मानेही शिंदे गटात सामील होणार आहेत. त्यानंतर आज पत्रकार परिषद घेत दोन्ही खासदार आपली भूमिका मांडणार आहेत. दरम्यान, धैर्यशील माने यांची एक ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामध्ये माझी भावना उद्धव ठाकरेंसोबत, पण प्रवाहासोबत जावं लागणार, असं म्हटलं आहे. ही क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत असून यावर अद्यापही अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये.

धैर्यशील माने यांनी कार्यकर्त्यांसोबत झालेल्या संवादात मनातील खदखद व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यातील संघर्ष संपावा आणि दोन्ही नेते पुन्हा एकदा एकत्र यावे, अशी माझी इच्छा आहे. मात्र, काही गोष्टी या हाताबाहेर गेल्या आहेत. त्यामुळे नेतृत्व जो निर्णय घेईल तो आपल्याला मान्य करावा लागेल. आपण सध्या परिस्थितीचे बळी झालो असून अशी राजकीय परिस्थिती कोणाच्याही आयुष्यात येऊ नये. मात्र, माझी भावना उद्धव ठाकरेंसोबत असली तरीपण प्रवाहासोबत जावं लागणार, असं धैर्यशील माने म्हणाले.

मी कधीही छक्के पंजे करून राजकारण केलं नाही. कधी पैशाच्याही मागे धावलो नाही. जे समोर येत गेलं ते करत राहिलो. माझा भावनिक संबंध हा उद्धव ठाकरे यांच्यासोबत खूप आहे. मात्र, मी शिवसेना सोडत नाही, शिवसेना ही अंतर्गत वेगळी झालेली आहे. मी जरी शिंदेगटात गेलो तरी मी शिवसेना सोडली असा अर्थ होत नाही. लोकप्रतिनिधी म्हणून लोकांच्या कामाला न्याय देणे हे माझे कर्तव्य आहे, असं माने म्हणाले.

एवढ्या राजकीय घडामोडी होत असताना देखील शिंदेंनी गुवाहाटीमध्ये बसून आपल्या मतदार संघातील एका फाईलवर सही केली. मागील दोन ते तीन वर्षांत असे काहीही घडलेले नाही. अनेक कामे करताना मर्यादा आल्या आहेत. आमदारांसारखी खासदारांमध्येही नाराजी आहे, असं माने म्हणाले. दरम्यान, या क्लिपमधून धैर्यशील माने हे आपली नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत. मात्र, या ऑडिओबाबत कोणत्याही प्रकारची अधिकृत माहिती किंवा सत्यता समोर आलेली नाहीये.


हेही वाचा : शिंदे गटातील ३ नगरसेवकांचा भाजपात प्रवेश, नाईकांचा मुख्यमंत्र्यांना मोठा धक्का


 

First Published on: July 19, 2022 1:58 PM
Exit mobile version