राज्यात करोनाचे पुन्हा डोके वर

राज्यात करोनाचे पुन्हा डोके वर

राज्यात करोनाबाधितांच्या संख्येत घट होत असताना शनिवारी राज्यातील रुग्णांच्या संख्येत वाढ झाली. शनिवारी राज्यात ३२८ नवीन रुग्ण सापडले असून, मागील काही दिवसांच्या तुलनेत हा आकडा अधिक आहे. तसेच चार दिवसांच्या मृतांच्या तुलनेत शनिवारी करोनाबाधित मृतांच्या संख्येतही वाढ झाली. शनिवारी 11 करोनाबाधितांचा मृत्यू झाला.

राज्यात ३२८ नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे राज्यातील करोनाबाधित रुग्णांची संख्या ३६४८ झाली आहे. मात्र, 15 एप्रिलपासून राज्यात मिळत असलेल्या करोनाबाधितांची संख्या ही 200 च्या घरात होती. मात्र, शनिवारी करोनाबाधितांची संख्या थेट ३२८ वर पोहचली आहे. त्याचबरोबर चार दिवसांत मृत झालेल्या करोनाबाधितांची संख्या ही एक आकडी असताना शनिवारी राज्यात 11 जणांचा मृत्यू झाला. मृतांपैकी मुंबईतील ५ आणि पुण्यातील ४ तर १ मृत्यू औरंगाबाद मनपा आणि १ मृत्यू ठाणे मनपा येथील आहे. दोन दिवसांपासून मुंबई व महाराष्ट्रात करोनाबाधितांच्या कमी होत असलेल्या रुग्ण संख्येमुळे मिळालेला दिलासा हा अल्पकाळच टिकला. शनिवारी झालेल्या मृत्यूंपैकी ६ पुरुष तर ५ महिला आहेत. ११ मृत्यूंपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ५ रुग्ण आहेत तर ६ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ६० या वयोगटातील आहेत. मृत्यूमुखी पडलेल्या ११ जणांपैकी ९ रुग्णांमध्ये ( ८२ %) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. एकीकडे रुग्णसंख्या व मृतांचा आकडा शनिवारी वाढला असताना रुग्ण बरे होण्याच्या संख्येतही वाढ झालेली पाहायला मिळाली. शनिवारी 34 जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आल्याने आजपर्यंत 365 करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ६७,४६८ नमुन्यांपैकी ६३,४७६ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ३६४८ जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ८२,२९९ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून ६९९९ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

First Published on: April 19, 2020 5:20 AM
Exit mobile version