पक्ष आणि चिन्हावर दावा सांगणं लोकशाहीला घातक, अनिल देसाईंची प्रतिक्रिया

पक्ष आणि चिन्हावर दावा सांगणं लोकशाहीला घातक, अनिल देसाईंची प्रतिक्रिया

Anil Desai

सत्तासंघर्षाच्या सुनावणीला दुपारी ४.१५च्या सुमारास सुरुवात झाली. सुनावणीदरम्यान ठाकरे गटाकडून वकील कपिल सिब्बल आणि कामत यांनी मुद्दे उपस्थित केले. शिंदे गटाकडून चिन्हाचा निर्णय तातडीनं व्हावा असा आग्रह करण्यात आला. शिंदे गटाने हा संपूर्ण युक्तीवाद राज्याच्या विधानसभेत आणि लोकसभेत निवडून आलेले सदस्य म्हणजे बहुमताचा आकडा ज्याच्याकडे सर्वात जास्त आहे, त्या बाजूने निर्णय घेण्यात यावा, असा आग्रह शिंदे गटाकडून करण्यात आला. जे पूर्णत: लोकशाहीला घातक आहे. परंतु आम्हाला न्यायदेवतेवर आणि केंद्रीय निवडणूक आयोगावर पूर्ण विश्वास आहे, अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे नेते अनिल देसाई यांनी दिली आहे.

अनिल देसाई सुनावणी संपल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयाबाहेर आले. यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, आमदार आणि खासदारांना मूळ पक्षाने तिकीट दिल्यानंतर आणि तिथल्या पक्षप्रमुखाने तिकीट दिल्यानंतरच ते त्या पक्षाचे उमेदवार होतात. निवडणूकीत निवडून आल्यानंतर ते आमदार किंवा खासदार ठरतात. त्यांचा काळ हा पक्षाने ठरवलेला असतो. त्यामुळे मूळ पक्ष हा महत्त्वाचा आहे. यावेळी २० लाखांहून अधिक प्राथमिक सदस्य दिले. आम्ही दिलेले पुरावे तीन लाखांच्या घरात आहेत, असं अनिल देसाई म्हणाले.

आमच्या प्रतिनिधित्वाचे आणि पदाधिकारीचे पुरावे आम्ही देऊन सुद्धा त्यांनी या सर्व गोष्टींना डावललं. परंतु शिंदे गटाने बहुमताच्या आकड्यावर निर्णय घ्यावा, अशा प्रकारचा आग्रह धरला आहे. त्यामुळे भारताची लोकशाही धोक्यात येतेय का?, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे, असंही अनिल देसाई म्हणाले.

शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांची प्रतिक्रिया…

आमच्याकडून युक्तीवाद संपलाय. आमच्याकडे बहुमत आहे. त्यामुळे आम्हीच मूळ शिवसेना आहोत. आमच्याकडे संघटनेचं नियंत्रण आहे. २०१८ची घटना फ्रॉड आहे. १९९९ मध्ये बाळासाहेबांनी घटना बनवली. २०१८ मध्ये उद्धव ठाकरेंनी गुप्तपणे घटनात्मक निवडणूका रद्द केल्या. त्यामुळे एकनाथ शिंदे नाराज होते. त्यामुळेच हे सगळं घडलंय, अशी प्रतिक्रिया शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी दिली आहे.

शिवसेनेच्या शिंदे-ठाकरे गटाच्या वादावर आज सकाळी सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. ही सुनावणी 14 फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आली. परंतु दुपारनंतर केंद्रीय निवडणूक आयोगात धनुष्यबाण चिन्हावर तब्बल दोन तास सुनावणी झाली. या सुनावणीदरम्यान शिंदे गटाने आपली भूमिका मांडली. त्यानंतर पुढच्या आठवड्यात आता ठाकरे गट आपली भूमिका मांडणार आहे. त्यामुळे पुढील सुनावणी आता १७ जानेवारीला होणार आहे.


हेही वाचा : बायकोच्या भरवशावर राजकारण करणारा.., राणांवर टीका करताना देशमुखांची जीभ घसरली


 

First Published on: January 10, 2023 6:54 PM
Exit mobile version