शरद पवारांचं मन वळवण्यासाठी देशमुखांनी २ कोटी मागितले; वाझेचा ईडीकडे खुलासा

शरद पवारांचं मन वळवण्यासाठी देशमुखांनी २ कोटी मागितले; वाझेचा ईडीकडे खुलासा

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची मनधरणी करण्यासाठी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी २ कोटी मागितले होते, असा धक्कादायक खुलासा सचिन वाझेने ईडीकडे केला आहे. शरद पवार यांचा सचिन वाझेला पुन्हा पोलीस दलात रुजू करण्यास विरोध होता. त्यामुळे पवारांचं मन वळवण्यासाठी अनिल देशमुख यांनी २ कोटी रुपये खर्च करण्यास सांगितले होते, असं सचिन वाझेने ईडीला सांगितलं आहे.

सचिन वाझेने पैसे भरण्यास असमर्थता दर्शवली होती. त्यावर अनिल देशमुख यांनी ते वेळेवर देण्यास सांगितले होते, असा दावा वाझेने केला आहे. तसंच सचिन वाझेने अनिल परब आणि देशमुख यांच्याविषयी देखील दावा केला आहे. जुलै २०२० मध्ये तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी १० पोली उपायुक्तांच्या बदल्या आणि नियुक्त्यांचे आदेश जारी केले होते. मात्र, आदेशांवर परिवहन मंत्री अनिल परब आणि अनिल देशमुख खुश नव्हते. त्यांनी तो आदेश माघारी घेतला होता, असा दावा वाझेने केला आहे.

दरम्यान, याविषयी पुढे सांगताना वाझेने सांगितले, “तीन ते चार दिवसानंतर मला कळालं की पैसे आणि इतर काही तडजोडींनंतर हा आदेश जारी करण्यात आला होता. या पोलीस अधिकाऱ्यांकडून एकूण ४० कोटी रुपये घेण्यात आले होते. त्यापैकी २० कोटी रुपये संजीव पलांडे यांच्यामार्फत अनिल देशमुख यांना तर, २० कोटी आरटीओ अधिकारी बजरंग करमाटे यांच्यामार्फत अनिल परब यांना देण्यात आले होते.”

अनिल देशमुख हे वाझेला त्यांच्या कार्यालय, घरी, राज्य अतिथीगृहात बोलावून विविध प्रकरणांच्या संदर्भात थेट निर्देश किंवा सूचना देत असत, असा खुलासा वाझेने केला आहे. तसंच, त्याने पुढे सांगताना सोशल मीडिया बनावट फॉलोअर केस सारख्या काही प्रकरणांमध्ये स्वत: अनिल देशमुख निर्देश द्यायचे असा दावा केला आहे.

 

First Published on: September 17, 2021 4:28 PM
Exit mobile version