गिरीश महाजन परत जा!

गिरीश महाजन परत जा!

अण्णा हजारे पंतप्रधानांना पत्र लिहिणार

लोकपाल नियुक्ती, लोकायुक्त कायदा व स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार शेतक-यांच्या शेतीमालास उत्पादन खर्चाच्या दीडपट भाव मिळावा या सहीत अन्य मागण्यांसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी बुधवारी सकाळी राळेगणसिध्दी येथील यादवबाबा मंदिरासमोर आपले नियोजित बेमुदत उपोषण आंदोलन सुरू केले आहे. दरम्यान अण्णा हजारे यांच्याशी चर्चा करण्यास राळेगणसिध्दीकडे निघालेल्या मंत्री गिरीश महाजन यांना अण्णांनी मनधरणी करण्यासाठी येऊ नका, आता काही उपयोग होणार नाही, असा स्पष्ट निरोप पाठविल्याने राळेगणसिध्दीतील आपला दौरा रद्द करून महाजन परत गेले.

लोकायुक्त कायदा, लोकपालाची नियुक्ती, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याच्या मागण्यांसाठी हजारे यांनी काही दिवसांपूर्वीच सरकारला 30 जानेवारीपासून उपोषण करण्याचा इशारा दिला होता. हजारे यांना उपोषणापासून परावृत्त करण्यासाठी राज्य सरकारचे संकटमोचक म्हणून ख्याती असलेल्या मंत्री गिरीश महाजन यांनी यापूर्वी दोन वेळा स्वत: राळेगणसिध्दीत येऊन हजारे यांच्याशी प्रदीर्घ चर्चा केली. मात्र या दोन्ही वेळा महाजन यांची शिष्टाई फळाला आली नाही.
त्यामुळे हजारे आपल्या उपोषणाचा निर्णयावर ठाम राहिले. दरम्यान हजारे यांची भेट घेऊन त्यांना उपोषणापासून रोखण्याच्या हेतूने गिरीश महाजन आज सकाळी राळेगण सिध्दीत येणार असल्याचा सरकारी दौरा जाहीर झाला होता. मात्र हजारे यांनी या वेळी ताठर भूमिका घेतली. त्यांनी आता भेटीला येऊन काहीच उपयोग होणार नाही असा स्पष्ट निरोप महाजन यांना पाठविला.

हजारे म्हणाले की, माझ्या आंदोलनाचा व माझा उल्लेख करून मोदींनी मागील निवडणुकीच्या वेळी मते मिळवून सत्ता संपादन केली. मागील 4 वर्षांमध्ये लोकपालासंदर्भात पंतप्रधान मोदी यांना तब्बल 34 वेळा पत्रे लिहिली. मात्र आपले पत्र मिळाले इतकेच उत्तर मिळाले. गेल्या 4 वर्षांमध्ये काहीही कार्यवाही झाली नाही. त्यामुळेच मी स्वत: मंत्री महाजन यांना मनधरणी करण्यासाठी येऊ नका, आता काही उपयोग होणार नाही, असा निरोप दिल्याचे हजारे यांनी सांगितले. माझ्या मागण्यांसाठी राज्य सरकार पेक्षा केंद्र सरकारची जबाबदारी जास्त आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकायुक्तच्या विषयाला कॅबिनेटमध्ये मंजुरी दिली असली तरी आता प्रत्यक्षात कायदा झाल्याशिवाय माघार घेणार नाही, असे हजारे यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान हजारे यांच्या उपोषणस्थळी राळेगणसिध्दीत कार्यकर्ते, ग्रामस्थ यांच्याबरोबरीने तरूणांची संख्या मोठी दिसत आहे. उपोषण सुरू करण्यापूर्वी ग्रामस्थ,युवक व कार्यकर्ते यांनी अण्णांच्या समवेत गावातून फेरी देखील काढली. तसेच नेहमीप्रमाणे संत यादवबाबा यांचे दर्शन घेऊन हजारे यांनी आपले आंदोलन सुरू केले आहे.

तब्येतीचा विचार करता अण्णा यांनी उपोषण मागे घ्यावे- महाजन
लोकायुक्त कायद्याच्या कक्षेत मुख्यमंत्री येणार असल्याचा निर्णय सरकारने घेतला असला तरी त्याचा अध्यादेश काढावा, अशी मागणी करणार्‍या अण्णा हजारे यांनी आपल्या वयाचा आणि तब्येतीचा विचार करता उपोषण मागे घ्यावे, अशी विनंती जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केली आहे. अण्णा हे राळेगणसिद्धी येथे उपोषणाला बसले आहेत. महाजन हे राळेगणसिद्धी येथे निघाले असल्याचे समजताच अण्णा यांनी त्यांना मला भेटायला येऊ नका, असा निरोप दिल्याने महाजन यांची निराशा झाली. पण ही निराशा न दाखवता महाजन यांनी अण्णाच्या तब्येतीची काळजी करत विषयाला बगल दिली. लोकायुक्त, स्वामिनाथन आयोगाच्या मागण्या काँग्रेस सरकारच्या इतक्या वर्षांच्या सत्तेत झाल्या नाहीत, पण भाजप सरकारने त्या मागण्या मान्य केल्या, हे लक्षात घेतले पाहिजे, असे महाजन म्हणाले.

First Published on: January 31, 2019 6:09 AM
Exit mobile version