उद्धव यांना झटका; ठाकरे गटातील अजून एक मंत्री जाणार शिवसेनेत

उद्धव यांना झटका; ठाकरे गटातील अजून एक मंत्री जाणार शिवसेनेत

एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांसोबत बंडखोरी केल्यानंतर त्यांचा गट हीच खरी शिवसेना यांवर निवडणूक आयोगाकडून शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. असे असतानाच शिंदेंच्या शिवसेनेत नेहमीच एक ना एक नेत्याचा प्रवेश पाहायला मिळत आहे. शिवसेनेत नेत्यांची इनकमिंग वाढलेली असताना ह्यामुळे ठाकरे गटाला मात्र धक्क्यावर धक्के मिळत आहे. ठाकरे गटाचे राज्यसभेचे खासदार आणि नेते सुभाष देसाई यांचा मुलगा भूषण देसाई याने सोमवारी (ता. १३ मार्च) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश केला. या घटनेला २४ तास उलटत नाही तोच आता ठाकरे गटाचे नेते आणि माजी आरोग्यमंत्री दीपक सावंत हे सुद्धा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

माजी आरोग्यमंत्री दीपक सावंत हे सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. गेल्या काही महिन्यांपासून दीपक सावंत हे राजकारणापासून लांब होते. तर २०२० मध्ये सुद्धा ते शिवसेनेला रामराम करण्याच्या चर्चा रंगल्या होत्या.

हेही वाचा – भूषण देसाई शिंदे गटात का गेले?, एकनाथ खडसेंचा मोठा खुलासा

कोण आहेत दीपक सावंत

दरम्यान, दीपक सावंत हे उद्धव ठाकरे यांच्या अत्यंत जवळचे आणि विश्वासू मानले जायचे. परंतु गेल्या काही महिन्यांपासून ते एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. त्यामुळे दीपक सावंत यांचा शिंदेंच्या शिवसेनेत होणार प्रवेश हा ठाकरे यांना मोठा झटका असल्याचे बोलले जात आहे.

तसेच, २०२० मध्ये उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असतानाच दीपक सावंत हे पक्षावर नाराज होते. त्यावेळी त्यांनी आपली नाराजी उघडपणे दर्शविली होती. तर तयाचवेळी ते पक्षाला जय महाराष्ट्र करण्याच्या मनस्थितीत होते. पक्षाला माझी गरज नसेल तर पक्षाने मला मोकळे करावे, उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केल्यानंतर लवकरच मी माझ्या पुढील निर्णय घेणार आहे. गेल्या दीड वर्षापासून मी पक्षाकडे काम मागत आहे, मात्र मला कोणतेही काम वा जबाबदारी देण्यात आलेली नाही, असा आरोप करतानाच मला निवृत्त व्हायची इच्छा नाही. मी पूर्वी सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून समाजकार्य करायचो. तेच काम मी पुन्हा सुरू करू शकतो, असे सांगत शिवसेनेला रामराम करण्याचे स्पष्ट संकेत सावंत यांनी २०२० मध्ये दिले होते.

First Published on: March 15, 2023 5:36 PM
Exit mobile version