महापौर, उपमहापौर पदासाठी सोमवारी अर्ज होणार दाखल

महापौर, उपमहापौर पदासाठी सोमवारी अर्ज होणार दाखल

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदांची निवड शुक्रवारी होणार आहे. या निवडी करिता विशेष बैठक आयोजित करण्यात आली आहे. सोमवार दुपारी ३ ते ५ वाजेपर्यंत महापौर, उपमहापौर पदाचे उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. तेव्हाच काही अंशी महापौर आणि उपमहापौर पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार हे स्पष्ट होईल.

महापौर निवडी संदर्भातील आरक्षण सोडत जाहीर

पिंपरी चिंचवड महापालिकेचे महापौर राहुल जाधव यांचा कार्यकाळ संपत असून त्यांच्या रिक्त होणाऱ्या जागेवर नव्या महापौर तसेच उपमहापौर यांची निवड करण्यात येणार आहे. नुकतेच महापौर निवडी संदर्भातील आरक्षण सोडत जाहीर झाले आहे. पिंपरीच्या महापौरपदी पुढील अडीच वर्षाच्या काळासाठी सर्वसाधारण महिला (खुला गट) याकरिता राखीव ठेवण्यात आले आहे. त्यानुसार येत्या शुक्रवारी महापौर आणि उपमहापौर पदाची निवड केली जाणार आहे. विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी या निवडणूक प्रक्रियेकरिता पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त शंतनू गोयल यांची पिठासीन अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.

भाजपाच्या तब्बल २१ नगरसेविका आल्या निवडून 

सर्वसाधारण महिला खुला गट प्रवर्गातून सत्ताधारी भाजपाच्या तब्बल २१ नगरसेविका निवडून आल्या आहेत. यापूर्वी पहिले अडीच वर्षे भोसरीचे आमदार महेश लांडगे यांचे समर्थक नितीन काळजे व राहुल जाधव यांची वर्णी लागली आहे. त्यामुळे आता चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या समर्थकांची पुढील कार्य काळासाठी वर्णी लागेल अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.


हेही वाचा – नाशिकच्या महापौरपदाची निवडणूक २२ नोव्हेंबरला होणार


 

First Published on: November 15, 2019 8:28 PM
Exit mobile version