करोनाच्या काळात बदल्या, क्रीम पोस्टिंग

करोनाच्या काळात बदल्या, क्रीम पोस्टिंग

उल्हासनगर महानगर पालिका

राज्यात एकीकडे करोनाच्या साथीने धुमाकूळ घातला असताना दुसरीकडे नगरविकास खात्यामध्ये मात्र बदल्या आणि क्रीम पोस्टिंगचा धडाका लागला आहे. उल्हासनगर महापालिका आयुक्तपदावरून सुधाकर देशमुख यांची तर पनवेल महापालिका आयुक्त पदावरून गणेश देशमुख यांची अकस्मात उचलबांगडी करण्यात आली आहे. समीर उन्हाळे यांना पुन्हा एकदा उल्हासनगर महापालिका आयुक्तपदी नियुक्ती देण्यात आली आहे. तर पनवेल पालिका आयुक्त गणेश देशमुख यांना ठाणे महापालिकेत अतिरिक्त आयुक्त पदावर पाठवण्यात आले आहे. उल्हासनगरमधून बदली करण्यात आलेले आयुक्त सुधाकर देशमुख यांना अद्याप कोणतीही नियुक्ती देण्यात आली नसली तरीही रिक्त झालेल्या पनवेल पालिका आयुक्त पदासाठी ते वेटिंगवर असल्याचे सांगण्यात येते.

ठाणे महापालिकेतील दोन्ही अतिरिक्त आयुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यांच्या जागी दोन नवे अतिरिक्त आयुक्त देण्यात आले आहेत. याआधी राजेंद्र अहिवर आणि समीर उन्हाळे असे दोन अतिरिक्त आयुक्त ठाणे पालिकेत कार्यरत होते. या दोघांचीही बदली करताना समीर उन्हाळे यांना पुन्हा एकदा उल्हासनगर महापालिकेत पालिका आयुक्त पदावर पाठवण्यात आले आहे. समीर उन्हाळे यांनी यापूर्वी उल्हासनगरमध्ये आयुक्त म्हणून सक्षमपणे काम केले असल्यामुळे करोनाच्या काळातही ते उल्हासनगरात चांगली कामगिरी पार पाडतील अशा अपेक्षेने राज्य सरकारने त्यांची नियुक्ती उल्हासनगरात केली आहे. उन्हाळे यांच्याबरोबरच राजेंद्र अहिवर यांचीही बदली करण्यात आली असून त्यांची नियुक्ती अद्याप स्पष्ट होऊ शकलेली नाही. पालिकेतील या दोन्ही अतिरिक्त आयुक्तांच्या रिक्त पदांवर पनवेलचे पालिका आयुक्त गणेश देशमुख आणि दुसरे संजय हेरवाडे अशा दोघांना नियुक्त करण्यात आले आहे. याबरोबरच उल्हासनगर पालिकेतील उपायुक्त संतोष देहेरकर यांची वसई-विरार महापालिकेत अतिरिक्त आयुक्त पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

First Published on: May 21, 2020 6:15 AM
Exit mobile version