भाजपाच्या ‘या’ नेत्यांचे कर्करोगामुळे निधन

भाजपाच्या ‘या’ नेत्यांचे कर्करोगामुळे निधन

भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक हे गेल्या अनेक महिन्यांपासून कर्करोगाशी झुंज देत होते. अखेर या भाजपाच्या बड्या नेत्यांची कर्करोगाशी झुंज अपयशी ठरली. मात्र, याआधीही भाजपाच्या अनेक बड्या नेत्यांना कर्करोगाचा सामना करावा लागला होता. परंतु, त्या नेत्यांचीही कर्करोगाशी झुंज अपयशी ठरली होती. हे नेते कोण आहेत, हे थोडक्यात जाणून घेऊयात… (Arun Jaitley Manohar Parrikar Laxman Pandurang Jagtap Mukta Tilak Ananth Kumar This Bjp Leader Died Due To Cancer)

लक्ष्मण जगताप

पिंपरी चिंचवड शहर भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ नेते, भाजपचे माजी शहराध्यक्ष आणि विद्यमान आमदार लक्ष्मण पाडुरंग जगताप (60) यांचे मंगळवारी (3 जानेवारी 2023) सकाळी 9:30 वाजताच्या सुमारास दीर्घ आजाराने बाणेर येथील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये निधन झाले.

मुक्ता टिळक

पुण्यातील कसबा मतदारसंघाच्या भाजपच्या आमदार तथा पुण्याच्या माजी महापौर मुक्ता टिळक यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. मागील वर्षी 22 डिसेंबर 2022 रोजी त्यांचे निधन झाले. त्या ५७ वर्षांच्या होत्या. गेल्या अनेक महिन्यांपासून त्या कर्करोगाशी झुंजत होत्या. पुण्यातील गॅलेक्सी केअर रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

मनोहर पर्रीकर

गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचेही कर्करोगामुळे निधन झाले. मनोहर पर्रीकर वर्षभराहून अधिक काळ कर्करोगाशी झुंज देत होते. अखेर त्यांचे पणजी येथे 17 मार्च 2019 रोजी निधन झाले. निधनाच्या दोन दिवसांपूर्वी त्यांची तब्येत खालावली होती.

अरुण जेटली

भाजपाचे वरिष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांचे नवी दिल्लीमध्ये निधन झाले. 24 ऑगस्ट 2019 रोजी अरुण जेटली यांचे दुपारी 12 वाजून 7 मिनिटांनी निधन झाले. अरुण जेटली यांच्यावर वेगवेगळ्या विभागांच्या डॉक्टरांचे पथक उपचार करत होते. श्वसनाचा त्रास सुरू झाल्यामुळे जेटलींना रुग्णालयात दाखल केले गेले. निधनापूर्वी जेटली हे अनेक महिने कर्करोग या आजाराशी झुंज देत होते. मात्र, जेटलींची ही झुंज अपयशी ठरली.

आपल्या युक्तिवाद पूर्ण वक्तृत्वाने भल्याभल्यांना गारद करणारे माजी केंद्रीय अर्थमंत्री, भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांच्या राजकीय प्रवासास विद्यार्थी दशेपासूनच सुरुवात झाली होती. जेटली यांनी दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेचं अध्यक्षपद भूषवतानाच आणीबाणीच्या काळात तुरुंगवासही भोगला होता. विद्यार्थी नेते ते केंद्रीय अर्थमंत्रीपदापर्यंतच्या प्रवासात त्यांनी मिळालेल्या प्रत्येक संधीचं सोनं केलं. अर्थमंत्री, संरक्षण मंत्री, कायदा मंत्री म्हणून त्यांची कारकिर्द प्रचंड गाजली होती.

अनंत कुमार

केंद्रीय संसदीय कार्य मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अनंतकुमार यांचे 12 नोव्हेंबर 2018 रोजी पहाटे बंगळुरू येथील रुग्णालयात निधन झाले. अनंतकुमार हे 59 वर्षांचे होते. अनंतकुमार यांना फुप्फुसाचा कॅन्सर झाला होता. निधनापूर्वी त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. त्यावेळी मे महिन्यात कर्नाटकमधील निवडणुकांसाठीच्या प्रचारादरम्यान कफाचा त्रास बळावल्याने त्यांना उपचारांसाठी लंडन तसंच न्यूयॉर्क येथे जावं लागलं होतं.

First Published on: January 3, 2023 4:13 PM
Exit mobile version