‘ही सरसकट कर्जमाफी नव्हे, सरसकट फसवणूक आहे!’

‘ही सरसकट कर्जमाफी नव्हे, सरसकट फसवणूक आहे!’

भाजपचे नेते आमदार आशिष शेलार

राज्यातील नवनिर्वाचित ठाकरे सरकार पहिल्या दिवसापासूनच विरोधकांच्या निशाण्यावर राहिलं आहे. अगदी पहिल्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकासआघाडीच्या सरकारवर परखड टीका करायला सुरुवात केली होती. त्या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारने नुकतेच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे २ लाखांपर्यंतचे कर्ज माफ करण्यासंदर्भातील जीआर अर्थात शासन निर्णय जारी केला. मात्र, त्यावर आता विरोधकांनी टीका करायला सुरुवात केली आहे. राधाकृष्ण विखे पाटील आणि राम शिंदे यांनी शनिवारी दुपारी पत्रकार परिषद घेऊन आधी या कर्जमाफीच्या निर्णयावर टीका केली. आता भाजप आमदार आणि माजी शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी देखील नव्या सरकारवर तोफ डागली आहे. ‘ही शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी नसून सरसकट फसवणूक आहे’, असं ते म्हणाले आहेत. यासंदर्भातलं एक प्रसिद्धिपत्रक देखील त्यांनी त्यांच्या ट्वीटर अकाऊंटवर पोस्ट केलं आहे.

अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांचं काय?

‘२ लाखांपेक्षा ५ हजार रुपये देखील कर्ज जास्त असेल, तर त्याला कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही. त्याशिवाय मराठवाडा आणि विदर्भातल्या ज्या शेतकऱ्यांच्या कर्जाचं पुनर्गठन झालेलं नाही आणि कर्ज २ लाखांपेक्षा जास्त आहे, अशा शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळणार कसा?’, असा सवाल आशिष शेलार यांनी उपस्थित केला आहे. त्यासोबतच, ‘३० सप्टेंबर २०१९पर्यंतच कर्जमाफीची मुदत असल्यामुळे यंदाच्या अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा मिळू शकणार नाही. त्यामुळे ही योजना सरसकट कर्जमाफी करणारी नाही’, अशी टीका या प्रसिद्धिपत्रकात आशिष शेलार यांनी केली आहे.

‘नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांचं काय?’

दरम्यान, ‘देवेंद्र फडणवीस सरकारने शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांसाठी विशेष प्रोत्साहन योजना जाहीर केली होती. त्यामुळे अशा शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला होता. मात्र, ठाकरे सरकारच्या कर्जमाफी योजनेमध्ये असा कोणताही दिलासा नाही. त्यामुळे नियमित कर्ज भरणारा शेतकरी या योजनेमध्ये वंचित राहणार आहे’, असा आक्षेप देखील आशिष शेलार यांनी घेतला आहे.

First Published on: December 28, 2019 7:47 PM
Exit mobile version