सत्ताधारी शिवसेनेच्या गुंडगिरीमुळे राज्यात अराजक, आशिष शेलारांचा आरोप

सत्ताधारी शिवसेनेच्या गुंडगिरीमुळे राज्यात अराजक, आशिष शेलारांचा आरोप

महाराष्ट्रात अराजकतेची परिस्थिती निर्माण झाली आहे. सत्ताधारी शिवसेनेच्या गुंडगिरीमुळे राज्यात अराजक निर्माण झाले असल्याचा घणाघाती आरोप भाजप आमदार आशिष शेलार यांनी केला आहे. राणा दाम्पत्यांविरोधातील शिवसैनिकांचा आक्रमकपणा, मोहित कंबोज यांच्या गाडीवर करण्यात आलेला हल्ला तसेच पोलखोल अभियानादरम्यान सुरु असलेल्या कुरघोड्यांवरुन भाजप आमदारांनी सत्ताधारी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. शिवसेनेच्या गुंडगिरीविरुद्ध भाजप लोकशाही मार्गाने लढा देईल असे भाजप आमदारांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले आहे.

भाजप आमादर आशिष शेलार यांच्यासह इतर आमदार खासदारांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी आशिष शेलार यांच्यासह सर्वच आमदारांनी शिवसेनेवर घणाघात केला आहे. आशिष शेलार म्हणाले की, मोहित कंबोज यांच्यावरील हल्ला हे नामर्दपणाचे लक्षण आहे. कंबोज यांच्यावर हल्ला करणाऱ्या कार्यकर्त्यांनी व त्यांना पाठीशी घालणाऱ्या शिवसेनेच्या नेत्यांनी आपणही एकटे फिरणार आहोत हे ध्यानात ठेवावे. राज्यात सत्ताधाऱ्यांच्या आशीर्वादाने अराजक निर्माण केले जात आहे. आम्ही कायद्याचे पालन करूच, पण या गुंडगिरीला सरकारने आवर न घातल्यास जशास तसे उत्तर देण्याचीही आमची तयारी आहे’ असा इशारासुद्धा आशिष शेलारांनी दिला आहे.

राज्य सरकार पुरस्कृत दहशतवाद – प्रवीण दरेकर

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर म्हणाले की, मुंबई महापालिकेतील शिवसेनेचा भ्रष्टाचार उघडकीस आणण्यासाठी भारतीय जनता पार्टीने सुरु केलेल्या पोलखोल यात्रेवर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी हल्ले चढविले. शुक्रवारी मोहित कंबोज यांच्या वाहनावर हल्ला चढविला गेला. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचीही गुंडगिरी पोलीस यंत्रणा निमूटपणे पाहत बसली आहे. पोलखोल यात्रेत अडथळे आणण्याचे कितीही प्रयत्न झाले तरी ही यात्रा सुरूच राहील. मुंबईत व राज्यात सुरु असलेला राज्य सरकार पुरस्कृत दहशतवाद आजवर महाराष्ट्राने पाहिला नव्हता. या हिंसाचाराला जशास तसे उत्तर भाजपा कार्यकर्ते देऊ शकतात. मात्र आम्ही या विरोधात पोलीस आयुक्तांकडे दाद मागून लोकशाही मार्गाने लढा देऊ असेही प्रवीण दरेकर यांनी सांगितले.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या घरावर हल्ला प्रकरणी आंदोलकांना तातडीने पकडले गेले. त्यांच्या विरुद्ध वेगवेगळ्या कलमाखाली गुन्हे दाखल झाले. पोलखोल यात्रेवरील हल्लेखोर व राणा दाम्पत्याच्या घरावर हल्ला करणारे मात्र मोकाट आहेत. हल्लेखोरांना वेगळा न्याय का असा सवालही त्यांनी केला. भाजपा मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा म्हणाले की, सत्ताधाऱ्यांचा भ्रष्टाचार उघडकीस आणण्यासाठी सुरु केलेली पोलखोल यात्रा यापुढेही चालूच राहील. या दहशतवादाविरोधात आम्ही पोलीस आयुक्तांकडे दाद मागू. गृहमंत्र्यांनाही भेटण्याचा प्रयत्न करू. शिवसेनेच्या भ्रष्टाचारा विरोधातील लढाईत भाजपाला मुंबईकर साथ देतील असा विश्वास ही लोढा यांनी व्यक्त केला.


हेही वाचा : राणा दाम्पत्याला अडवलं तर मी जाऊन बाहेर काढणार, बघतो कोण अडवतं; आता राणेंचं सेनेला चॅलेंज

First Published on: April 23, 2022 6:15 PM
Exit mobile version