वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पाबाबत पेंग्विन सेनेने उत्तर द्यावे, अन्यथा… आशिष शेलारांचा इशारा

वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पाबाबत पेंग्विन सेनेने उत्तर द्यावे, अन्यथा… आशिष शेलारांचा इशारा

वेदांता – फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला नेल्याने महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापलेय, विरोधकांकडून सत्ताधारी शिंदे फडणवीस सरकारवर आरोप केले जात आहे. दरम्यान याच मुद्द्यावरील विरोधकांच्या आरोपांना आज भाजप नेते आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेत अनेक प्रश्न उपस्थित करत प्रत्युत्तर दिले आहे. वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पाबाबत पेंग्विन सेनेने उत्तर द्यावे, अन्यथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवृत्त उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशच्या मार्फत चौकशीचे आदेश द्यावे अशी मागणी करत शेलारांनी महाविकास आघाडी सरकारला अनेक प्रतिसवाल उपसथित करत निशाणा साधला आहे.

वेदांता प्रकल्पासंदर्भात महाराष्ट्रात राजकारण सुरु आहे. जी विधान केली जात आहेत, त्याने महाराष्ट्रातील जनतेच्या मनात पेंग्विन सेनेमार्फत भ्रम पसरवला जात आहे. म्हणून स्पष्टीकरण देणं गरजेचे आहे. वेदांता फॉक्सकॉन महाराष्ट्रात होता तर तो महाराष्ट्रात सुरु कधी झाला? या प्रकल्पाला महाराष्ट्रातील तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने सर्व परवानग्या दिल्या होत्या का? फॉक्सकॉन प्रकल्पाच्या सवलतीच्या संमती झाल्या होत्या का? त्या प्रकल्पाचे भूमिपूजन पायाभरणी महाराष्ट्रात झाली होती का? जाऊ द्या ते…. पण महाराष्ट्रात जिथे हा प्रकल्प प्रस्तावित होता तिथे जागेचे अॅक्विगेशन तरी झाले होते का? किमान वेदांता फॉक्सकॉनबरोबर तत्कालीन सरकारने करारनामा केला होता का? त्यामुळे विरोधकांना थेट सवाल आहे की, वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला खेचून नेला- गेला असे म्हणता तर हा महाराष्ट्रात होता कधी? त्याला सर्व परवानग्या मिळाल्या कधी? त्यामुळे विरोधक हा प्रकल्प गुजरातला खेचला गेला म्हणतात तेव्हा या प्रश्नांची उत्तर अपेक्षित असल्याची मागणी आशिष शेलारांनी केली आहे.

आता खोट सहन केलं जाणार नाही. केवळ तुमच्या मनातला मुख्यमंत्री झाला नाही म्हणून किंबहुना एक बाळासाहेबांचा, आनंद दिघेंचा शिवसैनिक मुख्यमंत्री झाला म्हणून त्याला हिणवणे, हाणून पाडून बोलणं, त्याला बदनाम करणं यासाठी तुम्ही रान उठवणार असाल तर मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरं पेंग्विन सेना देत नसेल तर निवृत्त उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशच्या मार्फत याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी शेलारांनी करत महाराष्ट्राला सत्य कळलचं पाहिजे. बोलायचे दात वेगळे आणि करायचे ओठ वेगळे हे आता चालणार नाही, महाराष्ट्र या भूलथापांना बळी पडणार नाही. अशा शब्दात विरोधकांना सुनावले आहे.


राजकीय स्वार्थापोटी चुकीचे, नकारात्मक निराधार दावे; वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पावरून फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा


First Published on: September 15, 2022 11:57 AM
Exit mobile version