शिंदे गटाकडून अशोक चव्हाणांच्या योजनेला मंजुरी, पण राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा

शिंदे गटाकडून अशोक चव्हाणांच्या योजनेला मंजुरी, पण राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा
मुंबई – शिवसेनेतील अनेक निष्ठावान कार्यकर्ते, नेत्यांना आपल्या गटात शिंदे गटाने सामील करून घेतल्यानंतर अशोक चव्हाणही पक्षांतराच्या बेतात असल्याच्या चर्चा काही दिवसांपूर्वी  सुरू होत्या. त्यातच, महाविकास आघाडी सरकारने घेतलेले सर्व निर्णय रद्द करण्याचा धडाका शिंदे सरकारने लावलेला असताना अशोक चव्हाणांच्या मतदारसंघातील कामांना मात्र मंजुरी दिली आहे. त्यामुळे अशोच चव्हाणांकडून काही महत्त्वाची पावले उचलली जाणार आहेत का याबाबत शंका उपस्थित केली जात आहे.

हेही वाचा – माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना जामीन मंजूर, पण राहणार तुरूंगातच

अशोक चव्हाण काँग्रेसमध्ये नाराज असल्याच्या चर्चा आहेत. त्यामुळे ते भाजप किंवा शिंदे गटात जाण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आल्यानंतर बहुमत चाचणीवेळी अशोक चव्हाण सभागृहात उशीरा पोहोचले होते. तेव्हापासून आघाडीत बिघाड झाल्याच्या चर्चा आहेत. अशोक चव्हाणांनी हे दावे फेटाळून लावले असले तरीही राजकीय क्षेत्रात दबक्या आवाजात अशोक चव्हाणांच्या पक्षांतरांच्या चर्चा जोरात आहेत. त्यातच, शिंदे सरकारने अशोक चव्हाणांच्या मतदारसंघातील महत्त्वाच्या योजनांना मंजुरी दिली आहे.

हेही वाचा – इतिहासात प्रथमच मुंबईत शिवसेनेचा दोन ठिकाणी दसरा मेळावा; गर्दीसाठी दोन्ही गटांकडून हजारो एसटी, खासगी बसेसचे बुकिंग

अशोक चव्हाण यांच्या भोकर विधानसभा मतदारसंघात वॉटरग्रीड योजनेसाठी मंजुरी मागितली होती. या योजनेला शिंदे-फडणवीस सरकारने ग्रीन सिग्नल दिला आहे. या योजनेमुळे मतदारसंघातील १८३ गावांना पाणी मिळू शकणार आहे. यासाठी ७२८ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून दहा दिवसांपूर्वी निविदा काढण्यात आल्या आहेत.

अशोक चव्हाणांची नांदेडमध्ये मोठी राजकीय तादक आहे. २०१४ च्या मोदी लाटेतही त्यांनी विजय मिळवला होता. नांदेड जिल्ह्यातील अनेक मतदारसंघावर त्यांचा प्रभाव असल्याने भाजपाने त्यांना आपल्या गळाला लावण्याचा प्रयत्न केला आहे.

उस्मानाबाद, बीड जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यांना संजीवनी मिळणार

उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यांना संजीवनी मिळणार आहे. कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पास गती देण्यासाठी ११ हजार ७३६ कोटी ९१ लाख रुपयांच्या सुधारित खर्चास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या प्रकल्पामुळे मराठवाड्यातील २ जिल्ह्यातील अवर्षणप्रवण क्षेत्रातील १३३ गावांतील १ लाख १४ हजार हेक्टर क्षेत्राला लाभ होणार आहे. कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प हा गोदावरील मराठवाडा पाटबंधारे विकास मंडळ, औरंगाबाद अंतर्गत उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यातील कृष्णा खोऱ्याच्या भागात प्रस्तावित असून प्रथम टप्प्यात ७ अघफू व दुसऱ्या टप्प्यात १६.६६ अघफू असे एकूण २३.६६ अघफू पाणी वापर आहे. या प्रकल्पामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा, भूम, वाशी, कळंब, तुळजापूर, लोहारा व उमरगा तसेच बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्याला लाभ होणार आहे.

First Published on: October 4, 2022 3:07 PM
Exit mobile version