अभिभाषणातच खोळंबा!

अभिभाषणातच खोळंबा!

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त विधानाचे पडसाद गुरुवारी विधानसभा आणि विधान परिषद सदस्यांच्या संयुक्त बैठकीत उमटले. सत्ताधारी आणि विरोधी पक्षाकडून जोरदार घोषणाबाजी झाल्याने राज्यपाल कोश्यारी यांनी अभिभाषणाच्या दोन ओळी वाचून सभागृहातून काढता पाय घेतला. राज्यपालांनी अभिभाषण पूर्ण न करताच सभागृहातून निघून जाण्याचा हा विधिमंडळ इतिहासातील पहिलाच प्रसंग आहे. अधिवेशनाची सुरुवात वादळी झाल्याने सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हे आहेत.

अभिभाषणादम्यान राज्यपालांनी ‘छत्रपती शिवाजी महाराज’ यांचे नाव घेताच सत्ताधारी बाकावरून ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’च्या घोषणा दिल्या. त्याचवेळी विरोधी पक्षाकडून ‘दाऊदच्या दलाल मंत्र्याचा राजीनामा घ्या’ अशा घोषणा देत बॅनर झळकवत गोंधळ घालण्यात आला. हा गोंधळ पाहून राज्यपालांनी अभिभाषण न वाचताच सोडून दिले.

राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला राज्यपालांच्या अभिभाषणाने सुरुवात झाली. अभिभाषणासाठी राज्यपालांनी संयुक्त सभागृहात प्रवेश केल्यानंतर ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशा घोषणा सत्ताधारी बाकावरून देण्यात आल्या. राष्ट्रगीत झाल्यानंतर कोश्यारी यांनी अभिभाषण वाचण्यास सुरुवात केली. ‘माझे शासन, छत्रपती शिवाजी महाराज, महत्मा जोतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ असा उल्लेख राज्यपालांनी करताच पुन्हा एकदा ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’च्या घोषणा देण्यात आल्या. राज्यपालांना पुढील अभिभाषण वाचता यावे यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सभागृहात शांतता राखण्याचा हातानेच इशारा केला आणि सत्ताधारी बाकावरील सदस्य शांत झाले.

अभिभाषणादरम्यान भाजपच्या सदस्यांनी बॅनर झळकावून राज्यपालांच्या दिशेने घोषणाबाजी सुरू केली.‘दाऊदच्या दलाल मंत्र्याचा राजीनामा घ्या’, ‘नवाब मलिकांचा राजीनामा घ्या’, अशा घोषणा देत भाजप आमदारांनी बॅनरही फडकवले. एकीकडे अभिभाषण आणि दुसरीकडे घोषणाबाजी सुरू असताना राज्यपालांनी सुरुवातीच्या काही ओळी वाचून भाषण आटोपते घेतले आणि थेट सभागृहाबाहेर पडले. राष्ट्रगीतासाठीसुद्धा राज्यपाल थांबले नाहीत.संयुक्त सभागृहात घडलेल्या या अभूतपूर्व घटनेवरून सत्ताधारी आणि विरोधी पक्षाने एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले.

ही लाजीरवाणी गोष्ट: आदित्य ठाकरे
अभिभाषण सुरू असताना राज्यपालांनी असे निघून जाणे आणि त्यांचे भाषण सुरू असताना गोंधळ होणे या दोन्ही गोष्टी अयोग्य आहेत. ही लाजीरवाणी गोष्ट आहे. यामुळे महाराष्ट्राचा अपमान झालेला आहे. आम्हाला धक्का बसला आहे, असे होऊच कसे शकते? अशी प्रतिक्रिया पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी यावर व्यक्त केली.

भाजप आमदारांच्या बेशिस्तपणामुळे अपमान: जयंत पाटील
भाजप आमदारांच्या बेशिस्तपणामुळे राज्यपालांना सभागृह सोडावे लागले. महाराष्ट्राच्या इतिहासात कधीही न घडलेली दुर्दैवी घटना आज घडलेली आहे, अशा शब्दात जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. आम्हीही विरोधी पक्षात होतो. पण आम्ही कधीच सभागृहाचा अपमान केला नाही, असेही ते म्हणाले.
राज्यपाल सभागृहात आले तेव्हा महाविकास आघाडीच्या आमदारांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयघोष करत त्यांचे स्वागत केले. मात्र, भाजपच्या लोकांनी गोंधळ घातला. फलक झळकावले. त्यामुळे राज्यपाल राष्ट्रगीत पूर्ण होण्याआधीच निघून गेले. हा राष्ट्रगीताचाही अपमान आहे, असेही पाटील यांनी सांगितले.

तर राज्यपालांचे भाषण कशाला ऐकायचे : देवेंद्र फडणवीस
राज्यपाल सरकारच्यावतीने भाषण करायला आले होते आणि सदस्यांच्या भावना अतिशय तीव्र होत्या. तुम्ही सरकारच्यावतीने भाषण करीत आहात, पण तेच सरकार जर दाऊदला शरण होत असेल तर हे भाषण कशा करता ऐकायचे हा सदस्यांचा सवाल होता. त्यामुळे सदस्य एवढीच मागणी करीत होते की, नवाब मलिक यांचा राजीनामा झाला पाहिजे आणि ही मागणी आम्ही लावून धरणार आहोत, अशी प्रतिक्रिया विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

राज्यपालांना परत पाठवण्याचा ठराव
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज तसेच महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई यांचा अवमान केला आहे. महाराष्ट्राच्या दैवतांचा अपमान महाराष्ट्र कदापि सहन करणार नाही. या अपमानाबद्दल राज्यपालांना महाराष्ट्राची माफी मागावीच लागेल अशी मागणी करत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गुरुवारी राज्यपाल कोश्यारी यांना परत पाठवण्यासंदर्भात विधिमंडळात ठराव आणण्यासाठी कायदेशीर बाबींचा विचार सुरु असल्याची माहिती दिली.

भास्कर जाधव विधानसभा तालिका अध्यक्षपदी

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आमदार निलंबन प्रकरणी विरोधी पक्षाचा रोष ओढवून घेणारे शिवसेना आमदार भास्कर जाधव यांची गुरुवारी विधानसभा तालिका अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे.
राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या गुरुवारच्या पहिल्या दिवशी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी तालिका अध्यक्षांची नावे जाहीर केली. या यादीत संजय शिरसाट, दीपक चव्हाण, कुणाल पाटील, कालिदास कोळंबकर यांचाही समावेश आहे.

६, २५० कोटींच्या पुरवणी मागण्या
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या गुरुवारच्या पहिल्या दिवशी विधिमंडळात ६ हजार २५० कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्या. वीज थकबाकीपोटी शेतकर्‍यांची वीज खंडित केली जात असल्याचा आरोप विरोधी पक्षाकडून होत असताना सरकारने शेतकर्‍यांच्या वीज सवलतीसाठी ४९० कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

First Published on: March 4, 2022 5:30 AM
Exit mobile version