राज्यातील कसबा पेठ अन् चिंचवड पोटनिवडणुका जाहीर; ‘या’ दिवशी होणार मतमोजणी

राज्यातील कसबा पेठ अन् चिंचवड पोटनिवडणुका जाहीर; ‘या’ दिवशी होणार मतमोजणी

महाराष्ट्रातील कसबा पेठ आणि चिंचवड मतदारसंघातील पोटनिवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. कसबा पेठ आणि पिंपरी-चिंचवड या मतदारसंघांसाठी विधानसभा मतदारसंघांसाठी 27 फेब्रुवारी रोजी पोटनिवडणूक होणार आहे. (Assembly Elections Date Announced For Kasba Peth Chinchwad By poll Election Date Declares Maharashtra Election)

कसबा पेठ मतदारसंघातील भाजपा आमदार मुक्ता टिळक यांचे निधन झाले. तसेच, चिंचवडचे भाजपा आमदार लक्ष्मण जगताप यांचेही निधन झाले. त्यामुळे या दोन जागा रिक्त झाल्याने या ठिकाणी पोटनिवडणूक होणार आहे. या निवडणूकीसाठीची अधिसूचना 31 जानेवारी रोजी जारी करण्यात येणार असून 7 फेब्रुवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असणार आहे. 8 फेब्रुवारी अर्जांची छाननी तर 10 फेब्रुवारी पर्यंत अर्ज परत घेता येणार आहेत. या दोन्ही पोटनिवडणूकांसाठी मतदान 27 फेब्रुवारी रोजी होणार आहे आणि या निवडणूकीचा निकाल 2 मार्च रोजी जाहीर होईल.

दरम्यान कसबा पेठ आणि चिंचवड या मतदारसंघातील पोटनिवडणुकीत भाजपा विरोधात दोन्ही जागांवर महाविकास आघाडी उमेदवार देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच दोन्ही जागेवर आता भाजपकडून कुणाला उमेदवारी मिळणार याकडे आता लक्ष लागले आहे.

लक्ष्मण पांडुरंग जगतापांचे निधन

पिंपरी चिंचवड शहरातील भाजपाचे जेष्ठ आमदार लक्ष्मण पांडुरंग जगताप (60) यांचे मंगळवार 3 जानेवारी रोजी सकाळी दीर्घ आजाराने बाणेर येथील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये निधन झाले. आमदार जगताप हे गेली 2 वर्षांपासून आजारी होते. निधनापूर्वी मागील सहा महिन्यांपासून त्यांची तब्बेत खालवली होती. मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात त्यांच्या कुटुंबियांनी उपचारासाठी त्यांना अमेरिकेत नेले होते. त्यानंतर एप्रिल 2022 मध्ये ते पुन्हा मायदेशी परतले.

मुक्ता टिळक यांचे निधन

भाजपाच्या आमदार आणि पुण्याच्या माजी महापौर मुक्ता टिळक यांचे बुधवार 22 डिसेंबर 2022 रोजी दिर्घ आजाराने निधन झाले. पुण्यातील गॅलक्सी केअर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. अखेर ३ वाजून ३० मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.


हेही वाचा – त्रिपुरा, मेघालय, नागालँड राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा; ‘या’ तारखेला होणार मतदान

First Published on: January 18, 2023 4:14 PM
Exit mobile version