ईडीकडून अविनाश भोसलेंची ४०.३४ कोटींची मालमत्ता जप्त

ईडीकडून अविनाश भोसलेंची ४०.३४ कोटींची मालमत्ता जप्त

अविनाश भोसले

गेल्या काही महिन्यांपासून सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीच्या रडारवर असलेले पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांची ४० कोटी ३४ लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. ईडीने आतापर्यंत अविनाश भोसले यांच्यावर केलेली ही मोठी कारवाई मानली जात आहे. फेमा कायद्याअंतर्गत ईडीने भोसले यांची पुणे आणि नागपुरातील मालमत्ता जप्त केली आहे. विदेशी चलन प्रकरणात भोसले यांची दोन वेळा चौकशी झाली होती. चौकशीनंतर त्यांना सोडून देण्यात आले होते. या प्रकरणात त्यांच्या कुटुंबियांचीही चौकशी झाली होती. या संपूर्ण प्रकरणात आता ईडीने भोसले यांची ४० कोटी ३४ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.

२०१७ साली इन्कम टॅक्स विभागाने अविनाश भोसले यांच्या घरी छापा टाकल्यानंतर ते पुन्हा चर्चेत आले होते. अविनाश भोसले यांनी दक्षिण मुंबईत एक डुप्लेक्स फ्लॅट खरेदी केला आहे. अविनाश भोसले यांच्या ‘एबी’ज रिअलकॉन एलएलपी या कंपनीने ही गुंतवणूक केली आहे. या फ्लॅटसाठी त्यांनी १०३ कोटी ८० लाख रुपये मोजले आहेत.

First Published on: June 21, 2021 9:16 PM
Exit mobile version