फोन टॅपिंग प्रकरणात रश्मी शुक्ला फक्त प्यादं, मुख्य सूत्रधाराचा शोध घेण्याची अतुल लोंढेंची मागणी

फोन टॅपिंग प्रकरणात रश्मी शुक्ला फक्त प्यादं, मुख्य सूत्रधाराचा शोध घेण्याची अतुल लोंढेंची मागणी

फोन टॅपिंग प्रकरणात रश्मी शुक्ला फक्त प्यादं, मुख्य सूत्रधाराचा शोध घेण्याची अतुल लोंढेंची मागणी

फडणवीस सरकारच्या काळात राज्यातील विरोधी पक्षांच्या नेत्यांचे बेकायदेशीर फोन टॅपिंग झाल्याची गंभीर बाब समोर आली आहे. फडणवीस सरकारच्या काळात लोकांवर पाळत ठेवण्याचे गुजरात मॉडेल महाराष्ट्रात राबवले जात होते. या प्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावर गुन्हाही दाखल झाला आहे. पण रश्मी शुक्ला या एक प्यादं आहेत त्यांना फोन टॅपिंगचे आदेश देणारे कोण होते? हे समोर येणे आवश्यक आहे. त्यासाठी तत्कालीन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही चौकशी करावी अशी मागणी महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे.

काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी माध्यमांशी संवाद साधताना फोन टॅपिंग प्रकरणावरुन भाजपवर टीका केली आहे. राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाचे सरकार असताना लोकांवर पाळत ठेवण्याचे, त्यांचे खासगी संभाषण चोरून ऐकण्याचे गुजरात मॉडेल महाराष्ट्रात राबवले जात होते. २०१७-१८ साली काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपातील अनेक मंत्री, नेते, आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांचे फोन बेकायदेशीर टॅप करण्यात आले होते. अंमली पदार्थांचा व्यापार करत असल्याचे दाखवून राजकीय नेत्यांचे फोन टॅप करण्यात आले, अमजद खान नाव दाखवून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, निजामुद्दीन बाबू शेख हे नाव दाखवून राज्यमंत्री बच्चू कडू यांचे फोन टॅप करण्यात आले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभेत फोन टॅपिंगचा मुद्दा उपस्थित करून उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली होती. या चौकशीत रश्मी शुक्ला दोषी असल्याचे निष्पन्न झाल्याने गुन्हा दाखल केल्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले आहे.

मुस्लीम व्यक्तींची नावे वापरून फोन टॅप

दहशतवादी कारवाया, अंमली पदार्थांचा व्यापार अशा गंभीर प्रकरणाच्या तपासासाठी विशेष परवानगी घेऊन फोन टॅपिंग केले जाते परंतु नाना पटोले बच्चू कडू या नेत्यांचा याच्याशी काहीही संबंध नसताना त्यांचा मोबाईल क्रमांक आणि मुस्लीम व्यक्तींची नावे वापरून त्यांचे फोन टॅप करण्यात आले. ही अत्यंत गंभीर बाब आहे. फोन टॅप करुन एखाद्या व्यक्तीवर पाळत ठेवणे हा गंभीर गुन्हा आहे तसेच हा प्रकार व्यक्ती स्वातंत्र्याचा भंग करणारे आहे. फोन टॅपिंग प्रकरणाचा आम्ही अधिवेशनातही पाठपुरावा करु असे अतुल लोंढे म्हणाले आहेत.

देवेंद्र फडणवीस यांचीही चौकशी करावी

रश्मी शुक्ला यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला असला तरी फोन टॅपिंगचे रेकॉर्ड त्यांनी कोणाला दिले ? फोन टॅपिंगचा मुळ उद्देश काय होता? रश्मी शुक्ला यांना फोन टॅपिंग करण्याचे आदेश कोणी दिले? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे राज्यातील जनतेला मिळाली पाहिजेत. राज्य सरकारने फोन टॅपिंग प्रकरणाच्या चौकशीची व्याप्ती वाढवून तत्कालीन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही चौकशी करावी त्यातून या प्रकरणाचा मास्टरमाईंड कोण होता हे उघड होईल असे लोंढे म्हणाले.


हेही वाचा : OBC Reservation : ओबीसींच्या राजकीय आरक्षणावरील सुनावणी लांबणीवर; 2 मार्चला होणार पुढील सुनावणी

First Published on: February 28, 2022 3:01 PM
Exit mobile version