औरंगजेबाची कबर पर्यटनासाठी 5 दिवस बंद; पुरातत्त्व विभागाचा निर्णय

औरंगजेबाची कबर पर्यटनासाठी 5 दिवस बंद; पुरातत्त्व विभागाचा निर्णय

औरंगाबाद जिल्ह्यातील खुल्ताबाद येथील मुघल बादशहा औरंगजेबाची कबर पाच दिवसांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. यासंदर्भात पुरात्त्व विभागाने निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता औरंगाबादमध्ये येणाऱ्या पर्यटकांना ही कबर पहता येणार नाही. एमआयएमचे तेलंगणाचे आमदार अकबरुद्दीन ओवैसी आणि औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी औरंगजेबाच्या कबरीचे दर्शन घेतले होते. त्यानंतर कबर परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झाले. यामुळे कबरीला काही अज्ञातांकडून धोका असल्याचे स्थानिकांचे म्हणणे होते. यापार्श्वभूमीवर आता अखेर पुरात्त्व विभागाने औरंगजेबाची कबर पाच दिवसांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

एमआयएमचे अकबरुद्दीन ओवैसी आणि इम्तियाज जलील यांनी औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन घेत त्याच्यासमोर नतमस्तक झाले. औरंगजेबाच्या कबरीसमोर नतमस्तक झाल्याने संपूर्ण महाराष्ट्रात तणावाचे वातावरण निर्माण झाले. शिवाय, मुघल बादशहाने महाराष्ट्राचे एवढे नुकसान केले असतानाही त्याच्या कबरीसमोर कुणी नतमस्तक कसे होऊ शकते, असा सवाल करत ओवैसींच्या कृत्याचा निषेध करण्यात आला.

त्यानंतर, काही हिंदुत्ववादी संघटनांनीही आक्रमक प्रतिक्रिया दिली होती. या सर्व पार्श्वभूमीवर प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. शिवाय याच मुद्द्यावरून भाजपाने शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. त्याचप्रमाणे अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनीही शिवसेना प्रमुखांना याबद्दल जाब विचारला. हनुमान चालिसा म्हणल्यानंतर आमच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला. पण औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन घेणाऱ्या ओवैसी आणि जलील यांच्याविरोधात काहीही कारवाई झाली नाही. खुर्चीसाठी तुम्ही हिंदुत्ववादी विचारसरणी सोडली आहे. पोलीसही सरकारसमोर लाचार आहेत, असा आरोप करण्यात आला.


हेही वाचा – ओबीसी आरक्षण महाराष्ट्रात लागू होणार का?; उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात…

First Published on: May 19, 2022 12:05 PM
Exit mobile version