पगारात होणारी कपात आणि मुलीच्या लग्नाची चिंता; एसटी चालकाची आत्महत्या

पगारात होणारी कपात आणि मुलीच्या लग्नाची चिंता; एसटी चालकाची आत्महत्या

आत्महत्या

अपघातामुळे पगारात होणारी कपात आणि मुलीच्या लग्नाची चिंता यामुळे एसटी चालकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना औरंगाबादमध्ये घडली आहे. ही घटना बुधवारी सकाळी १० वाजता सुरेवाडी येथे घडल्याचे उघडकीस आले आहे. रामसिंग धनसिंग डेडवाल (५७), असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी हर्सूल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

सुरेवाडी येथे राहणारे डेडवाल हे गेल्या २९ वर्षांपासून एसटी महामंडळात चालक होते. ते अनेक वर्षांपासून दोन मुले आणि पत्नीसह भाड्याच्या घरात राहत होते. तसेच डेडवाल यांनी शेतीवर कर्ज घेतले होते. मात्र, त्यांच्याकडून अपघात झाला होता. त्यामुळे त्याची भरपाई म्हणून त्यांच्या पगारातून कपात केली जात होती. आर्थिक चणचण आणि वयात आलेल्या मुलीच्या लग्नाची चिंता त्यांना सातत्याने सतावत होती. त्यामुळे ते काही दिवसांपासून तणावात होते आणि या तणावातूनच त्यांनी आपले आयुष्य संपवले.

नेमके काय घडले?

रामसिंग डेडवाल यांची बुधवारी साप्ताहिक सुट्टी होती. त्यादिवशी त्यांनी सकाळी रुममधील फॅनला ओढणी बांधत गळफास घेतला. दहा वाजले तरी ते खोलीबाहेर आले नसल्याने पत्नी आणि मुलीने हाका मारल्या, पण काही प्रतिसाद मिळाला नाही. त्यांनी शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा तोडला असता डेडवाल यांनी गळफास घेतल्याचे दिसले. या घटनेची हर्सूल पोलिसांना माहिती देण्यात आली असून डेडवाल यांना बेशुद्धावस्थेत घाटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी जमादार डी. बी. राठोड हे तपास करीत आहेत.


हेही वाचा – पुणे : पेस्ट कंट्रोल बेतले जीवावर; दाम्पत्याचा मृत्यू


 

First Published on: February 13, 2020 10:14 AM
Exit mobile version