राज्यात ‘बेबी किट’ योजना सुरू

राज्यात ‘बेबी किट’ योजना सुरू

'बेबी किट' योजनेचे उदघाटन करताना पंकजा मुंडे

सुदृढ आणि उत्तम आरोग्य असलेले बालक, हेच खरे देश रक्षक हे उद्दीष्ट ठेवत महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागातर्फे राज्यात ‘बेबी केअर किट योजना’ सुरू करण्यात आली आहे. महिला व बाल विकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. नवजात बालकांचे मृत्यूंचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात ‘बेबी किट’ योजना राबवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्यानुसार जन्माला येणाऱ्या नवजात बालकाला अंगणवाडीच्या मार्फत बेबी किट उपलब्ध होणार आहे. राज्यात दरवर्षी २२ लाख प्रसूती होतात आणि १० लाख प्रसूती या शासकीय हॉस्पिटलमध्ये होतात. त्यातील, ३ लाख महिलांची पहिल्यांदाच प्रसूती होते.

बालकांच्या मृत्यूचे हे कारण

अनेकदा स्वच्छतेच्या अभावी, तसेच जी बालके वयाने एकावर्षापेक्षा लहान असतात त्या बालकांचा मोठ्या प्रमाणात मृत्यू होतो. बऱ्याचदा हायपोथेरेमीया या आजारामुळे म्हणजेच थंडी वाजल्यानंतर थरथरणे यामुळे बालकांचा मृत्यू होतो. ग्रामीण भागात आजही तेवढी जागृती नसल्याकारणाने बाल मृत्यूंचं प्रमाण जास्त आहे. यामध्ये शहरी भागात आठ लाख तर आदिवासी, ग्रामीण भागात बारा लाख महिलांची प्रसुती होते. नवजात बालक जन्माला आल्यानंतर त्यांच्या आरोग्याच्या सुरक्षेच्यादृष्टीकोनातून आवश्यक वस्तूंचा पुरवठा करून बालमृत्यूचे प्रमाण कमी करणे शक्य होऊ शकेल या उद्देशातून ही योजना मंजूर करण्यात आल्याचे शासन निर्णयात म्हटले आहे.

” महिला व बाल विकास विभाग गेली २ वर्ष या संकल्पनेवर विचार आणि काम करत होते. ज्या मातांची पहिली प्रसूती असते त्या मातांना बाळाला कशा पद्धतीने हाताळावं, त्याची स्वच्छता आणि काळजी कशी घ्यावी याची तेवढी जाणीव त्यासोबत प्रशिक्षण नसतं. बालकांच्या स्वागतासाठी सरकारचा हा निर्णय आहे. अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून पहिल्यांदा गर्भधारणा आणि प्रसूती झालेल्या मातेला हे किट दिलं जाणार आहे. प्राथमिक स्वरुपात सीएसआरच्या माध्यमातून ही योजना सुरू करण्यात आली आहे.” – पंकजा मुंडे, महिला व बाल विकास मंत्री

प्रसतीवेळी होणार या योजनेचा फायदा

राज्यातल्या प्रत्येक मातेला पहिल्या प्रसूतीच्यावेळी या योजनेचा फायदा घेता येऊ शकेल असं महिला आणि बालविकास विभागाच्या शासन निर्णयात म्हटले आहे. विकसित देशांमध्ये बालमृत्यू रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या विविध उपाययोजनांमध्ये बालकांना बेबी केअर किट पुरवण्यास प्राधान्य देण्यात येते. आंध्र प्रदेश, तमिळनाडू आणि तेलंगणा राज्यात नवजात बालकांना ‘बेबीकेअर किट’ उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

किटमध्ये एकूण १७ साहित्य 

या योजनेंतर्गत लहान मुलांचे कपडे, झोपण्याची लहान गादी, लहान मुलांचे टॉवेल, तापमान यंत्र (इलेक्ट्रॉनिक थर्मामीटर), लहान मुलांच्या अंगाला लावायचे तेल, शॅम्पू, खेळणी, नेल कटर, मच्छरदाणी, हातमोजे- पायमोजे, आर्इसाठी हात धुण्याचे लिक्विड, लहान मुलांना बांधायचे कापड, सर्व साहित्य ठेवण्यासाठी बॅग आदी विविध दोन हजार रुपयांचे सामान या किटच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. गरोदर असताना सरकारी हॉस्पिटल किंवा आरोग्य केंद्रात नोंदणी केलेल्या आणि त्या ठिकाणी प्रसुत होणाऱ्या माता या योजनेसाठी पात्र असतील. नोंदणी केल्यानंतर अपवादात्मक स्थितीत खासगी हॉस्पिटलमध्ये प्रसुती झाली तरी त्या महिलांना योजनेचा लाभ मिळू शकेल असेही शासन निर्णयात स्पष्ट केलं आहे.

First Published on: January 29, 2019 2:05 PM
Exit mobile version