नाराजांचे रुसवे काढू; कामाला लागा : थोरात

नाराजांचे रुसवे काढू; कामाला लागा : थोरात

निवडणुकीत अनेकांना तिकीट मिळण्याची इच्छा व अपेक्षा असते. तिकीट न मिळाल्याने इच्छुकांमध्ये मतभेद व नाराजी होते. मात्र, आम्ही सर्वांचे रुसवे, फुगवे बाजूला करु. डॉ. शोभा बच्छाव बाहेरच्या नाहीत. त्यांचे माहेर धुळे शहरातील असून, सासर मालेगाव आहे. एखादी कन्या बाहेर जाऊन कर्तृत्व दाखवत असेल तर त्यात हरकत काय आहे? त्या परक्या कुठे ठरतात? त्यांच्या विजयासाठी सर्वांनी जोमाने काम करावे. घरात चार भावंडे असतील तर भांडणे होतातच. आपले आमदार व खासदार झाले की खुशाल भांडू, असे प्रतिपादन काँग्रेसचे विधीमंडळ नेते तथा आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले.

महात्मा गांधी रोडवरील काँग्रेस भवन येथे जिल्हाध्यक्ष माजी आ. शिरीष कोतवाल यांची नियुक्ती झाल्याबद्दल व पदाधिकार्‍यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष शिरीष कोतवाल, माजी जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, शहराध्यक्ष आकाश छाजेड, आमदार हिरामण खोसकर, शरद आहेर आदी मान्यवर उपस्थित होते. थोरात म्हणाले, ईडीच्या कारवाया नागरिक विसरलेले नाहीत. केंद्रात हुकूमशाही राजनीती आहे. मणिपूरमध्ये अत्याचार थांबलेला नाही. नागरिकांमध्ये सत्ताधार्‍यांविरोधात संतप्त भावना आहेत. त्यामुळे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या निवडणुकीत मतदारांकडे काँग्रेसची बाजू मांडावी. जिल्हाध्यक्ष कोतवाल म्हणाले, भाजपाने शेतकर्‍यांचे नुकसान केले आहे. चुकीच्या प्रचाराच्या जोरावर त्यांनी मतदारांची दिशाभूल केली आहे. त्यामुळे काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजपाच्या प्रत्येक आरोपाला उत्तर द्यावे, काँग्रेसची भूमिका पटवून द्यावी. कार्यकर्ता सक्षम झाला पाहिजे. काँग्रेस धर्मनिरपेक्ष पक्ष आहे. खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमुळे नागरिक भारावले असून, काँग्रेसकडे कल वाढत आहे. शरद आहेर म्हणाले की, डॉ. तुषार शेवाळे हे धुळ्याच्या जागेसाठी इच्छुक होते. संधी न मिळाल्याने ते नाराजी असले तरी त्यांच्या रक्तात काँग्रेस आहे. प्रदेश काँग्रेस डॉ. शेवाळे यांची दखल घेईल. त्यांचा सन्मान ठेवला जावा.

First Published on: April 17, 2024 1:31 PM
Exit mobile version