सात दिवसांपेक्षा अधिक काळ फाईली अडकवू नका – बच्चू कडू

सात दिवसांपेक्षा अधिक काळ फाईली अडकवू नका – बच्चू कडू

राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना गूडन्यूज देत कर्मचाऱ्यांसाठी पाच दिवसांचा आठवडा जाहीर केला. या निर्णयाचे कर्मचारी स्तरावर स्वागत केले जात असतानाच राज्यमंत्री बच्चू कडू यांनी मात्र या निर्णयाला विरोध केला आहे. पाच दिवसांचा आठवडा घ्या, पण कार्यक्षमता सुधारा, सात दिवसांपेक्षा अधिक काळ फाईल अडकवून ठेवू नका, असा सल्ला गुरुवारी जलसंपदा राज्य मंत्री बच्चू कडू यांनी सरकारी कर्मचाऱ्यांना दिला आहे. त्यामुळे सरकारी कर्मचारी विरोधात बच्चू कडू असा सामाना पुन्हा एकदा रंगण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

सरकारी कर्मचारी आणि बच्चू कडू आमने सामने

राज्य सरकारने नुकत्याच पार पडलेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत सरकारी कर्मचाऱ्यांना खुशखबर देत कर्मचाऱ्यांसाठी पाच दिवसांचा आठवडा जाहीर केला होता. हा निर्णय जाहीर होताच सरकारी कर्मचाऱ्यांनी मंत्रालयात आनंदोत्सव साजरा केल्यानंतर अनेकांनी त्यास नाराजी व्यक्त केली होती. याप्रकरणी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी देखील नाराजी व्यक्त केल्याने आता पुन्हा एकदा सरकारी कर्मचारी आणि बच्चू कडू आमने सामने उभे राहिले आहे. या निर्णयाविरोधात बोलताना बच्चू कडू म्हणाले की, पाच दिवसांचा आठवडा करताना सरकारी कर्मचाऱ्यांचे कामाचे तास वाढवले हे चांगले आहे. त्यामुळे या निर्णयाचे स्वागत आहे. पण या निमित्ताने बच्चू कडू यांनी सरकारी कर्मचाऱ्यांना २००६ मधील सेवा हमी कायद्याची आठवण करून दिली.

दोन खात्याच्या फाईल ४५ दिवसांमध्ये क्लिअर झाल्या पाहिजे

ते म्हणाले की, सेवा हमी कायद्यानुसार सात दिवसांपेक्षा अधिक काळ कोणतीही फाईल ठेवता येत नाही. त्याशिवाय दोन खात्याच्या फाईल ४५ दिवसांमध्ये क्लिअर झाल्या पाहिजे. सरकारी कर्मचाऱ्यांना सुविधा देण्यास हरकत नाही पण कामे प्रलंबित राहणार नाही याची काळजी घ्या. अनेकदा लोकांना प्रशासनापासून खूप त्रास होतो अशा शब्दात त्यांनी नाराजी व्यक्त केली. त्यामुळे बच्चू कडू यांच्या या निर्णयामुळे आता कर्मचारी आणि कडू यांच्यात पुन्हा एकदा वाकयुध्द सुरू होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.


हेही वाचा – मोबाईलवर खेळणारी महिला सभापतींना म्हणते तुम्ही कोण?


 

First Published on: February 13, 2020 9:52 PM
Exit mobile version