मोबाईलवर खेळणारी महिला सभापतींना म्हणते तुम्ही कोण?

सुरेखा दराडे यांची अचानक भेट; सात कर्मचारी गैरहजर असल्याचे उघड

जिल्हा परिषदेच्या आरोग्य सभापती सुरेखा दराडे यांनी गुरूवारी (दि.13) अचानक आरोग्य विभागाला भेट दिली असता, कर्मचार्‍यांनी त्यांनाही ओळखले नाही. मोबाईलवर खेळत असलेल्या एका महिलेनी सभापतींनाच ‘तुम्ही कोण?’ अशी विचारणा केली. विभागातील कर्मचार्‍यांची ’वन टू वन’ हजेरी घेतली असता सात कर्मचारी गैरहजर असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. गैरहजर कर्मचार्‍यांना नोटीस बजाविण्यात येणार आहे.

आरोग्य विभागात अधिकारी, कर्मचारीचं भेटत नाही अशी खुद्द सदस्यांकडून सभापती दराडे यांना सांगण्यात येत होते. यावर, सभापती दराडे यांनी गुरूवारी सायंकाळी साडेपाच वाजेला आरोग्य विभागाल भेट दिली. या भेटीत सभापती दराडे यांनी प्रत्येक कर्मचार्‍यांच्या टेबलाजवळ जाऊन विचारणा केली. यात अनेक कर्मचार्‍यांनी सभापतींना ओळखलेच नाही. एक महिला कर्मचारी मोबाईल खेळत असल्याचे आढळून आले त्यावर सभापती दराडे यांनी विचारणा केली असता तुम्ही कोण? अशी थेट विचारना केली.