राज ठाकरेंना ईडीची नोटीस ही सरकारची दडपशाही – बाळासाहेब थोरात

राज ठाकरेंना ईडीची नोटीस ही सरकारची दडपशाही – बाळासाहेब थोरात

बाळासाहेब थोरात

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सातत्याने सरकारच्या चुकीच्या धोरणाविरोधात आवाज उठवला आहे. लोकसभा निवडणुकीत त्यांनी मोदी सरकारचा पर्दाफाश केला होता. तसेच विरोधी पक्षांना एकत्रीत करून ईव्हीएम विरोधात जनआंदोलन छेडले आहे. मोदी, शाह यांच्या हुकुमशाही विरोधात ठाम पणे उभे राहिल्यामुळेच राज ठाकरे यांना ईडीने नोटीस पाठवली आहे. केंद्र सरकारच्या या दडपशाहीचा काँग्रेस पक्ष तीव्र निषेध करत आहे, अशी घणाघाती टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

हे वाचा – तपास यंत्रणांना निष्पक्षपणे काम करु दिले पाहीजे – संजय राऊत

या संदर्भात बोलताना थोरात म्हणाले की, राज ठाकरे यांना ईडीने पाठवलेली नोटीस ही मोदी, शाह यांनी सुडबुद्धीने केलेली कारवाई आहे. मोदी, शाह ही जोडी लोकशाहीला हरताळ फासून हुकुमशाही पद्धतीने देश चालवत आहेत. सरकारच्या चुकीच्या धोरणांना विरोध करणाऱ्या प्रत्येकाच्या मागे ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय यांच्या चौकश्या लावल्या जात आहेत. वरिष्ठ काँग्रसे नेते पी. चिदंबरम यांच्यासह अनेक काँग्रेस नेत्यांना ही अशाच प्रकारे त्रास देण्यात येत आहे. देशभरातील विरोधी पक्षाचे जे नेते सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधात आवाज उठवतात त्यांना अशा प्रकारच्या नोटीसा देऊन त्रास दिला जात आहे. मोदी शाह, जोडी संविधानिक संस्थांचा गैरवापर करून विरोधकांना संपवण्याचा प्रयत्न करत आहे, हे लोकशाहीसाठी घातक आहे. सरकार विरोधात बोलणा-यांना ईडीच्या नोटीसा पाठवायच्या, देशद्रोही ठरवायचे हाच मोदी शाह यांचा न्यू इंडिया आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

First Published on: August 19, 2019 2:01 PM
Exit mobile version