घरमहाराष्ट्रतपास यंत्रणांना निष्पक्षपणे काम करु दिले पाहीजे - संजय राऊत

तपास यंत्रणांना निष्पक्षपणे काम करु दिले पाहीजे – संजय राऊत

Subscribe

मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांना ईडीची नोटीस मिळाल्यानंतर महाराष्ट्रातले राजकारण चांगलेच तापले आहे. विरोधकांनी राज ठाकरेंना पाठिंबा देत ही नोटीस ईव्हीएमचा विरोध केल्यामुळेच आली असल्याची भूमिका मांडली आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीला राज ठाकरेंच्या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना म्हटले की, तपास यंत्रणांना निष्पक्षपणे काम करु दिले पाहीजे. ईडी किंवा इतर तपास यंत्रणांची नोटीस आल्यानंतर चौकशील हजर राहावे लागते. ईडीच्या कारवाईवर बोलणे उचित होणार नाही. ईडी किंवा आयकर विभाग आपापल्या पद्धतीने काम करत असल्याचेही राऊत यावेळी म्हणाले.

हे वाचा – ईडीच्या नोटीशीला मनसे भीक घालत नाही – मनसे 

राज ठाकरेंनी ईव्हीएम आणि सरकारच्या विरोधात आवाज उचलल्यामुळेच त्यांना नोटीस पाठविण्यात आली का? असा प्रश्न विचारताच राऊत म्हणाले की, “मी देखील अनेकवेळा सरकारच्या विरोधात आवाज उचलला आहे. मला ईडीची नोटीस आलेली नाही. हेच देशात लोकशाही जिवंत असल्याचे लक्षण आहे. ज्यांनी चुकीची कामे केली आहेत. त्यांनाच नोटीस येते. तपास यंत्रणांना निष्पक्षपणे काम करु दिले पाहीजे. या देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी, सोनिया गांधी यांची देखील चौकशी झालेली आहे.”

- Advertisement -

३७० सोबत रोजगाराकडेही लक्ष द्या

महाराष्ट्रात नोकऱ्यांची कपात होत आहे, उद्योगधंदे बंद पडत आहेत. सरकारने कलम ३७० रद्द केले त्याबद्दल त्यांचे अभिनंदन आम्ही केलेले आहेच. मात्र राष्ट्रीय अस्मितेसोबत पोटा पाण्याच्या विषयालाही सरकारने हात घातला पाहीजे. नाहीतर देशात अस्थिरता निर्माण होईल, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.

भाजपप्रमाणेच शिवसेनेतही इतर पक्षांतून भरती केली जात आहे. याप्रकरणावर बोलताना संजय राऊत म्हणाले की,  पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे टप्प्याटप्प्याने पक्षात प्रवेश देत आहेत. आम्ही पक्षप्रवेश करताना चाळणी लावलेली असून गाळ घेत नाहीत. तसेच राज ठाकरेंनी सांगली-कोल्हापूरमध्ये आलेल्या पुरामुळे निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी केली होती. यावर बोलताना राऊत म्हणाले की, तीन-चार जिल्ह्यातील पूरपरिस्थितीमुळे संपुर्ण राज्याची निवडणूक पुढे ढकलणे योग्य नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -