राणे सत्ता नसल्याने अस्वस्थ; बाळासाहेब थोरात यांचा राणेंना टोला

राणे सत्ता नसल्याने अस्वस्थ; बाळासाहेब थोरात यांचा राणेंना टोला

माजी मुख्यमंत्री नारायण राणेंनी राज्यपालांची सोमवारी भेट घेत राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली. त्यानंतर राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांनी राणेंवर टीकेची झोड उठवली. काँग्रेसचे नेते आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सुद्धा राणेंचा समाचार घेतला आहे. राज्यापालांना भेटलं म्हणून काय राष्ट्रपती राजवट लागू होते का? नारायण राणे अस्वस्थ आहेत. भाजपची सत्ता येईल, मंत्रीपद मिळेल, अशी त्यांना आशा आहे. ती अस्वस्थता त्यांना सत्तेपासून दूर बसू देत नाही आहे, अशा शब्दात बाळासाहेब थोरात यांनी राणेंवर टीकेची तोफ डागली. शिवाय त्यांनी भाजपवर देखील टीका केली आहे. भाजप असंतुष्ट आहे, त्यांना सत्तेची लालसा आहे. त्यामुळे ते राज्यपालांना सारखं भेटत असतात. तापलेल्या वातावरणात सत्तेची पोळी भाजणारी ही मंडळी आहे, अशी टीका थोरात यांनी केली.

राज्यात महाविकास आघाडी सरकार एकत्र चांगलं काम करतेय आणि आम्ही पुढेही एकत्र काम करणार आहोत. राज्यावर कोरोनाचं संकट आहे, त्या संकटाविरुद्ध आम्ही लढत आहोत. एकत्र येऊन कोरोनाविरुद्धची लढाई लढत आहोत. कोरोनाविरुद्ध आम्ही लढत आहोत, त्यामुळे भेटीगाठी चालणार आहेत. आम्ही सतत एकमेकांच्या संपर्कात सुद्धा आहोत. दिवसभरात अनेक वेळा आमचा फोनवरून एकमेकांशी संपर्क असतो.


हेही वाचा – ‘राष्ट्रपती राजवटीला घाबरले आणि लगेच बैठका घेतल्या’, नारायण राणेंचा सरकारला टोला


तिन्ही पक्षांचे नेते, मंत्री हे कोरोनाला कसं रोखता येईल, याचा विचार करत आहेत. पवारसाहेब आमच्या आघाडीचे नेते आहेत. ते भेट घेऊ शकतात, त्यामुळे त्याचा वेगळा अर्थ काढण्याची गरज नाही. आमचं सरकार स्थिर असून केवळ वातावरण निर्माण केलं जातंय, असं बाळासाहेब थोरात म्हणाले. विरोधी पक्षाने आमचं चुकत असेल तर चूका दाखवून द्याव्यात, राजकारण करू नये. कोरोना संपला की राजकारण करू. राजकारण करण्यासाठी भरपूर वेळ आहे. पण आता राष्ट्रपती राजवट हा मुद्दा पुढे आणू नये. आम्हाला काम करू द्या, अस आवाहन बाळासाहेब थोरात यांनी केलं.

 

First Published on: May 26, 2020 6:34 PM
Exit mobile version