आत्मनिर्भर भारत योजनेला चालना रंगीत टीव्हीच्या आयातीवर बंदी

आत्मनिर्भर भारत योजनेला चालना रंगीत टीव्हीच्या आयातीवर बंदी

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आत्मनिर्भर भारत योजनेला चालना देण्यासाठी सरकारने देशात रंगीत टीव्हीच्या आयातीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. परदेश व्यापार महासंचालनालयाने (डीजीएफटी) यासंदर्भात एक पत्रक काढले आहे. रंगीत टीव्हीसाठी असलेल्या आयात धोरणात बदल केले गेले असल्याची माहिती यात देण्यात आली आहे. तसेच मुक्त या श्रेणीतून हटवून प्रतिबंधित या श्रेणीत टाकण्यात आले आहे.

भारत, चीन, व्हिएतनाम व्हाँगकाँग, मलेशिया, कोरिया, इंडोनेशिया, जर्मनी आणि थायलंडसारख्या देशांकडूनही रंगीत टीव्ही आयात करतो. भारतात रंगीत टीव्हीची सर्वाधिक आयात चीन आणि व्हिएतनाममधून होते. २०१९ या आर्थिक वर्षात देशात तब्बल ७ हजार १२० कोटी रुपयांच्या रंगीत टीव्हीची आयात करण्यात आली होती. तर आर्थिक वर्ष २०२० मध्ये यात घट होऊन ती ५ हजार ५१४ कोटी रूपये इतकी झाली आहे. २०१९ या आर्थिक वर्षात रंगीत टीव्हीच्या आयातीत ५२.८६ टक्क्यांची वाढ झाली होती. परंतु आता सरकारने रंगीत टीव्हीच्या आयातीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.

सरकारची ही बंदी १४ इंचाच्या टीव्हीपासून ४१ इंच आणि त्यावरील टीव्हीसाठी लागू असणार आहे. तर दुसरीकडे पत्रकानुसार २४ इंचापेक्षा कमी असलेल्या लिक्विड क्रिस्टल डिस्प्ले टीव्हींवरही सरकारने बंदी घातली आहे. डीजीएफटीच्या माहितीनुसार रंगीत टीव्हीच्या आयातीवर बंदी घालण्यासाठी धोरणांमध्ये काही बदलही करण्यात आले आहे. जर बंदी घातलेल्या या वस्तूंपैकी कोणतीही वस्तू आयात करायची असेल तर संबंधित व्यक्तीला डीजीएफटीकडून त्याचा परवाना घ्यावा लागेल. परवाना देण्याची प्रक्रिया स्वतंत्रपणे डीजीएफटीद्वारे जारी केली जाईल.

First Published on: August 1, 2020 6:42 AM
Exit mobile version