‘बंजारा समाज’ देणार प्रस्थापितांना धक्का

‘बंजारा समाज’ देणार प्रस्थापितांना धक्का

बंजारा समाज देणार प्रस्थापितांना धक्का

बंजारा समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या भारतीय बहुजन क्रांती दल (बीबीकेडी) या राष्ट्रीय पक्षातर्फे येत्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून २२ जागेवर निवडणूक लढविणार असल्याची घोषणा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मोरसिंग राठोड यांनी केली आहे. आज झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली असून नुकत्याच झालेल्या २०१८ मधील मध्यप्रदेश , तेलंगणा, कर्नाटक या ठिकाणी बीबीकेडीच्या उमेदवारांकडून प्रस्थपिताना मोठे हादरे बसले होते. त्यामुळे महाराष्ट्रातही बंजारा समाजामुळे प्रस्थापितांना हादरा बसण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रात बीबीकेडी पक्ष २२ जागांवर निवडणूक लढवणार

भारतीय बहुजन क्रांती दल (बीबीकेडी) पक्षाची आज कोअर कमिटीची बैठक पार पडली. एकूण लोकसंख्येपैकी सव्वा कोटी लोकसंख्या महाराष्ट्रात तर संपूर्ण भारतात १२ कोटी लोकसंख्या बंजारा समजाची आहे. यापूर्वी अनेक दिग्गज नेते बंजारा समाजाने महाराष्ट्रासह भारतात निवडून दिले आहे . सध्या बंजारा समाजाचे अस्तित्व कायम राहावे तसेच अनेक अन्यायकारक बाबींची विधानसभेत सदस्य निवडून गेल्यास पूर्तता व्हावी या उद्देशाने महाराष्ट्रात २२ जागांवर निवडणुका लढविण्यात येणार असल्याचा निर्णय आज पार पडलेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत घेण्यात आला असल्याची माहिती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मोरसिंग राठोड यांनी दिली.

लोकसभा निवडणुकीत इतर पक्षांना बसणार मोठा फटका

महाराष्ट्रात २२ जागांसह संपूर्ण भारतात १२५ जागा लढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्रात दक्षिण मुंबई , कल्याण, डोंबिवली, जळगाव, वाशीम, यवतमाळ, हिंगोली, जालना, अहमदनगर, अकोला, नांदेड, परभणी, उस्मानाबाद, सोलापूर, औरंगाबाद, धुळे, रावेर, बुलढाणा, चंद्रपूर, लातूर, भिवंडी, पंढरपूर, नाशिक येथे लोकसभा निवडणुकीत बंजारा बीबीकेडी पक्षाचा उमेदवार रिंगणात उभा राहणार आहे. तसेच कर्नाटका, तेलंगणा , छत्तीसगढ, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश , राजस्थान, दिल्ली, हरयाणा, गुजरात, अंदमान, गोवा, पंजाब आदी ठिकाणी लोकसभा उमेदवार पक्षातर्फे निवडणूक लढविणार आहे. यावेळी पक्षाच्या कोअर कमिटीच्या झालेल्या बैठकीत बाबुराव पवार, मोहन राठोड, सिद्धार्थ ठाकूर, मंगल सिंग राठोड, राजू राठोड, नंदू पवार आणि ज्योती चव्हाण आदी पदाधिकारी उपस्थित होते. एकूणच महाराष्ट्रात बंजारा समजाचे प्राबल्य लक्षात घेता येत्या लोकसभा निवडणुकीत भाजप, सेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांना अनेक जागांवर मतांचा मोठ्या प्रमाणात फटका बसण्याची शक्यता आहे.


वाचा – बंजारा तरुणाचा खून का केला? – छगन भुजबळ


First Published on: February 10, 2019 4:53 PM
Exit mobile version