भाजपने कितीही जोर लावला तरी बारामतीचे मतदार सुज्ञ आहेत – अजित पवार

भाजपने कितीही जोर लावला तरी बारामतीचे मतदार सुज्ञ आहेत – अजित पवार

अजित पवार यांनी बारामतीच्या काटेवाडी येथे मतदान केले.

नेहमीप्रमाणे पवार कुटुंबियांनी बारामती आणि काटेवाडी येथे मतदान केले. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना अजित पवार म्हणाले की, “आजपर्यंत अनेक निवडणुका झाल्या, मात्र या निवडणुकीत लोकांचा उत्साह जास्त दिसत आहे. विशेषतः बारामती मतदारसंघात अमित शाह, मुख्यमंत्री आणि अनेक मंत्री येऊन गेले आहेत. तरिही बारामती मतदारसंघातील मतदारांवर आमचा विश्वास आहे. बारामतीचे मतदार सुज्ञ आहेत, ते सुप्रिया सुळे यांना निवडून देतील.”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिला.

अजित पवार पुढे म्हणाले की, “विदर्भात पहिल्या टप्प्याचे मतदान झाल्यानंतर भाजपची भाषा बदलली आहे. महाराष्ट्रात चित्र बदलले आहे. आम्ही १५ वर्ष सरकारमध्ये होतो. मनात आणले तर सरकारी यंत्रणेचा वापर करता येतो, लोकशाही मूल्य लक्षात घेता, तसे करता येत नाही. मात्र भाजपने यंत्रणेचा वापर करुन इतर पक्षातून उमेदवार आयात केले. त्यांचे स्वतःचे उमेदवार देखील बदलण्याची वेळ त्यांच्यावर आलेली आहे. आता देखील अनेक उमेदवार राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधून आयात केलेले उमेदवार अनेक ठिकाणी उभे केलेले दिसतात. भाजपकडून इतक्या खालच्या पातळीची राजकारणाची अपेक्षा नव्हती, मात्र त्यांनी ते केले.”

बारामती मतदारसंघाच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्यासमोर भाजपच्या कांचन कुल यांचे आव्हान आहे. कांचन कुल यांचे पती राहुल कुल हे रासप पक्षातून दौंड मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. बारामती हा मतदारसंघ पवार कुटुंबाचा बालेकिल्ला मानला जातो. २०१४ निवडणुकीत महादेव जानकर हे सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उभे राहिले होते. त्यावेळी त्यांनी सुळे यांना चांगलीच टक्कर दिली होती. आता कांचन कुल यांना मतदार पाठिंबा देणार का? हे २३ मे रोजी कळेल.

 

First Published on: April 23, 2019 9:39 AM
Exit mobile version