बीबीसीच्या कार्यालयाची चौकशी सुरूच, आयटी अधिकारी आणि संपादकांमध्ये वादंग

बीबीसीच्या कार्यालयाची चौकशी सुरूच, आयटी अधिकारी आणि संपादकांमध्ये वादंग

संग्रहित छायाचित्र

बीबीसीच्या मुंबई आणि दिल्लीतील कार्यालयांवर आयकर विभागाने धाडी टाकल्या असून कार्यालयाची कसून चौकशी केली जात आहे. काल दुपारपासून या चौकशीला सुरूवात झाली असून आजही ही चौकशी सुरूच आहे. आयकर विभागाकडून बीबीसीच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी केली जात आहे. मात्र, यावेळी आयटी अधिकारी आणि संपादकांमध्ये एकच वादंग निर्माण झाल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे आता हे प्रकरण आणखीन चिघळण्याची शक्यता आहे.

आयटी अधिकाऱ्यांकडून बीबीसीच्या दिल्ली आणि मुंबईतील कार्यालयांवर छापेमारी करत त्यांच्या बँक खात्यांची चौकशी करायला सुरूवात केली. त्यानतंर कर्मचाऱ्यांचे स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॅम्प्यूटर जप्त केले असून अनेकांना कार्यालयात प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बीबीसीच्या संपादकांनी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना एडिटोरियल कंटेंटचा ऍक्सेस देण्यास नकार दिल्यानंतर हा वाद झाल्याची माहिती आहे.

आयकर विभागानं कार्यालयांवर छापेमारी केल्यानंतर बीबीसीनं आपल्या कर्मचाऱ्यांना एक मेल पाठवून अधिकाऱ्यांना सहकार्य करण्यास सांगितलं आहे. अधिकाऱ्यांनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर प्रामाणिकपणे देण्याचं आवाहन बीबीसीनं कर्मचाऱ्यांना केलं आहे.

दोन्ही ठिकाणी आयकर विभागाकडून सर्वेक्षण सुरू असल्याचेही सांगण्यात आले आहे. आयटी विभागाच्या या कारवाईवर एडिटर्स गिल्ड ऑफ इंडियाकडूनही टीका करण्यात आली आहे. एडिटर्स गिल्ड ऑफ इंडियाकडून जाहीर करण्यात आलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे की, बीबीसी इंडियाच्या कार्यालयातील आयकर धाडीबद्दल ते अत्यंत चिंतेत आणि गंभीर आहेत. बीबीसी कार्यालयाच्या नवी दिल्ली आणि मुंबईतील आयकर विभागाच्या टीमकडून ही तपासणी केली जात आहे.

सरकारच्या धोरणांवर आणि सत्ताधारी पक्षावर टीका करणाऱ्या पत्रकार आणि पत्रकारांच्या संघटनांना धमकावण्यासाठी, त्यांना त्रास देण्यासाठी सरकारी संस्थांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे, असंही बीबीसीच्या संपादकांनी या कारवाईमध्ये म्हटले आहे.


हेही वाचा : ‘भावी मुख्यमंत्री जयंत पाटील’, समर्थकांकडून मुंबईत बॅनरबाजी; राजकीय वर्तुळात चर्चा


 

First Published on: February 15, 2023 4:56 PM
Exit mobile version