काळजी घ्या! कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर भारतात प्री डायबेटिज रुग्णांमध्ये वाढ

काळजी घ्या! कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर भारतात प्री डायबेटिज रुग्णांमध्ये वाढ

मुंबई – भारतात कोरोना संसर्गामुळे शारीरिक व मानसिक समस्या वाढल्या. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या नवीन मार्गदर्शक तत्वानुसार मधुमेह (Diabetes) रुग्णांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. गेल्या तीन दशकात भारतामध्ये मधुमेही रुग्णांमध्ये १५० टक्क्यांची वाढ झाली आहे. मधुमेहाच्या रुग्णांमध्ये वाढ होत असताना भारतात प्री डायबेटिजच्या (Pre-Diabetes) रुग्णांमध्येही वाढ होताना दिसत आहे.

हेही वाचा – डिजिलॉकर बनले ‘हेल्थ लॉकर’, वैद्यकीय कागदपत्रे करता येतील संग्रहित

सर्वाधिक मधुमेहांचे रुग्ण असलेल्या देशात भारताचा दुसरा क्रमांक लागतो. तर, चीन पहिल्या क्रमांकावर आहे. भारतामध्ये २५ ते ३४ वयोगटातील शहरी व ग्रामीण भागात टाईप २ मधुमेहाचे रुग्ण आढळून येत आहेत. प्रत्येकाने डायबेटीजबद्दल ऐकले असेल, परंतु तुम्हाला प्री डायबेटीजबद्दल माहिती आहे का? जर नसेल तर प्रत्येकासाठी हे जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे. याविषयी अधिक माहिती देताना एमडी इंटर्नल मेडिसिन तज्ज्ञ डॉ. हार्दिक ठक्कर म्हणाले, ‘आपल्याला मधुमेह झाला हे कळल्यावर रुग्ण आपली स्वतःची काळजी घेतो. परंतु ज्या नागरिकांना प्री-डायबिटीज आहे ते बेफिकीरपणे आयुष्य जगत असतात. प्री-डायबिटीज ही अशी स्थिती आहे, ज्यामध्ये रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण जास्त होते. प्री-डायबिटीज असलेल्या लोकांना मधुमेह होण्याचा धोका अधिक असतो.’

प्री डायबिटीज म्हणजे काय?

चक्कर येणे, वारंवार लघवीला होणे, सतत तहान लागणे ही प्री डायबेटिजची लक्षणे आहेत. ही लक्षणे काही रुग्णांमध्ये जवळपास दोन ते तीन वर्षांपर्यंत राहतात. तसंच, प्री डायबेटिसच्या काळात योग्य ती काळजी घेतल्यास मधुमेहाचा (Diabetes) धोका टाळता येऊ शकतो.

मधुमेह आणि प्री-डायबिटीज हे दोन्ही वेगळे आहे. मधुमेहामुळे हृदयविकाराचा झटका आणि मूत्रपिंडाच्या समस्या निर्माण होतात. प्री-डायबिटीजमुळे हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक आणि किडनीच्या समस्या यासारख्या गंभीर आरोग्य समस्या निर्माण होतात, अशी माहिती डॉ. हार्दिक ठक्कर यांनी दिली.

काय काळजी घ्या?

प्री-डायबेटिसमध्ये रुग्णांनी हृदयविकाराचा झटका टाळण्यासाठी दर आठवड्याला निरोगी आहार आणि किमान १५० मिनिटे नियमित व्यायाम करायलाच हवा. प्री-डायबिटीजच्या समस्येने त्रस्त असलेल्या व्यक्तींवर योग्य वेळी उपचार न केल्यास मधुमेहाचा धोका अनेक पटींनी वाढतो. एका अभ्यासानुसार, प्री-डायबिटीज असलेल्या लोकांना केवळ एका वर्षात मधुमेह होण्याचा धोका १० टक्के असतो. तर आयुष्यभर मधुमेह होण्याचा धोका ७० टक्क्यांपर्यंत असतो. प्री-डायबिटीजवर योग्य वेळी उपचार सुरू केले तर मधुमेहाची समस्या सहज टाळता येते. जे निरोगी जीवनशैलीचा अवलंब करतात, त्यांची ही समस्या आपोआप संपुष्टात येऊ शकते, असंही डॉक्टरांनी सांगितलं.

कोणाला सर्वाधिक धोका?

भारतामध्ये मधुमेह रुग्ण वाढत असताना प्री-डायबिटीज ही समस्या मूळ धरू लागली आहे. त्यामुळे जर आपण लठ्ठपणा, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल या समस्येने त्रस्त असाल तर वेळोवेळी आरोग्य तपासणी करून घ्यावी जेणेकरून मधुमेहाचा धोका टाळता येईल असंही डॉक्टर म्हणाले.

First Published on: November 10, 2022 4:44 PM
Exit mobile version