आजपासून दहावी परीक्षेचे अर्ज भरण्यास सुरूवात

आजपासून दहावी परीक्षेचे अर्ज भरण्यास सुरूवात

प्रातिनिधीक फोटो

महाराष्ट्र राज्य व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च 2020 मध्ये घेण्यात येणार्‍या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (दहावी) परीक्षेचे अर्ज भरण्यास 15 ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे. मार्च 2020 च्या परीक्षेसाठी नियमित विद्यार्थ्यांचे अर्ज 5 नोव्हेंबरपर्यंत तर पुनर्परिक्षार्थी, खासगी विद्यार्थी, श्रेणी सुधार योजनेंतर्गत व तुरळक विषय घेऊन परीक्षेला बसणार्‍या विद्यार्थ्यांना 6 ते 15 नोव्हेंबरपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचे आहेत. विद्यार्थ्यांची परीक्षेचे अर्ज www.mahahsscboard.maharashtra.gov.in किंवा www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर भरायचे आहेत.

दहावीची परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांना परीक्षेचे अर्ज भरण्याच्या प्रक्रियेची माहिती 14 सप्टेंबरला महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून जाहीर करण्यात आली. दहावी परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांचे अर्ज शाळांना सरल डेटाबेसवरून भरणे आवश्यक असल्याने त्यांची ‘सरल’वर नोंद करणे आवश्यक असल्याचे बोर्डाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

त्याचप्रमाणे पुनर्परिक्षार्थी, खासगी विद्यार्थी, श्रेणी सुधार योजनेंतर्गत व तुरळक विषय घेऊन परीक्षेला बसलेल्या विद्याथ्यार्र्ंचे अर्ज प्रचलित पद्धतीने शाळांनी भरायची आहेत. नियमित, पुनर्परिक्षार्थी, खासगी विद्यार्थी व श्रेणी सुधार योजनेंतर्गत दहावीची परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांना 16 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबरपर्यंत विद्यार्थ्यांना चलनाद्वारे परीक्षेचे शुल्क भरायचे आहे. दिलेल्या मुदतीत विद्यार्थ्यांचे अर्ज भरण्यात आले नाहीत तर विलंब शुल्कासह 16 ते 25 नोव्हेंबरपर्यंत अर्ज भरण्याची मुभा बोर्डाने दिली आहे.

कौशल्य सेतू अभियानाचे ट्रान्सफर ऑफ क्रेडीट मागणार्‍या विद्यार्थ्यांनी देखील ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरून विषयासमोर ट्रान्सफर ऑफ क्रेडीटची नोंद करावी. तसेच सबंधित विद्यार्थ्याने प्रचलित पद्धतीने अर्ज व आवश्यक कागदपत्रे विभागीय मंडळात जमा करायचे असल्याचे बोर्डाकडून नमूद करण्यात आले.

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे शुल्क माफ
दुष्काळग्रस्त भागातील दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार महसूल मंडळ, गाव, तालुका, जिल्हा तसेच विद्यार्थी किंवा पालकांच्या बँक खात्याची माहिती मंडळाने जमा करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. त्यानुसार विद्यार्थ्यांची सर्व माहिती माध्यमिक शाळांनी व्यवस्थित भरावी, असे आवाहन राज्यमंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी केले आहे.

First Published on: October 15, 2019 6:25 AM
Exit mobile version