RAGA Vs NAMO : निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हातातून निसटली; ते भयभीत होऊन खोटं बोलायला लागले – राहुल गांधी 

RAGA Vs NAMO : निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हातातून निसटली; ते भयभीत होऊन खोटं बोलायला लागले – राहुल गांधी 

इलेक्ट्रोल बॉण्डच्या माध्यमातून पंतप्रधानांनी मोठी चोरी केली - राहुल गांधी

सोलापूर – लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा आज थंडावल्या आहेत, तर तिसऱ्या टप्प्यातील प्रचार शिगेला पोहचला आहे. केंद्रीय नेत्यांच्या सभांनी महाराष्ट्रात धुराळा उडवून दिला. भाजप उमेदवारांसाठी अमित शहांनी अमरावतीत जाहीर सभा घेतली तर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अमरावती आणि सोलापूरमध्ये जाहीर सभेतून मोदींवर थेट निशाणा साधला. तिसऱ्या टप्प्यातील प्रचारात आता रंग भरायला लागला आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांसाठी आज केंद्रीय नेत्यांच्या विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात सभा झाल्या. विदर्भ आणि मराठवाड्यातील काही मतदारसंघात दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिलला मतदान होणार आहे. या आठ मतदारसंघासाठी आज (बुधवार) प्रचाराचा शेवटचा दिवस होता.

महाविकास आघाडीच्या सोलापूरमधील उमेदवार प्रणिती शिंदे आणि माढ्यातील उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारासाठी राहुल गांधी यांनी येथील एक्झिबिशन मैदान, मरी आई चौक येथे जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर थेट हल्लाबोल केला. इलेक्ट्रोल बॉण्ड, उद्योगपतींची कर्जमाफी यावरुन राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. त्यासोबतच काँग्रेसचे सरकार आल्यास महिला आणि तरुणांसाठी काँग्रेसच्या काय योजना असतील याची माहिती दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी भयभीत झालेत – राहुल गांधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसच्या घोषणापत्रावरुन हे मुस्लिम धार्जिने असल्याचा आरोप केला होता. त्यासोबतच तुमची संपत्ती काढून घेतील, असे आरोप केले होते. या आरोपांचा उल्लेख टाळून राहुल गांधी म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुळ मुद्यांवरुन जनतेचे लक्ष विचलीत करण्याचे काम करत आहेत. जनतेचा रोख त्यांच्या लक्षात आला आहे, निवडणूक हातातून निसटली असल्याचे लक्षात आल्यामुळे ते आता भयभीत झाले आहेत. आणि खोटं बोलायला लागले, असा आरोप राहुल गांधींनी केला.

इलेक्ट्रोल बॉण्डच्या माध्यमातून पंतप्रधानांनी मोठी चोरी केली आहे. निवडणुकीनंतर त्यांना ते निस्तारता येणार नाही, त्यांची फजिती होणार आहे, म्हणून ते घाबरले आहेत, असा टोला राहुल गांधींनी लगावला. ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्षात आले आहे की देशातील जनतेला इलेक्ट्रोल बॉण्डचे गौडबंगाल लक्षात आले आहे. देशातील जनता आता संविधान रक्षणासाठी पुढे सरसावली आहे. नरेंद्र मोदी गरीबांचे नाही तर अब्जाधिशांचे नेते आहेत, हे जनतेच्या लक्षात आले असल्याचे त्यांना कळाले आहे. त्यांचे बिंग फुटल्यामुळे ते भयभीत झाले आहेत. आणि घाबरल्यानंतर भयभीत झाल्यानंतर ते खोटं बोलायला सुरवात करतात. कधी पाकिस्तान तर कधी चीनबद्दल बोलायला लागतात, मात्र यंदा त्यांना कोणीही वाचवू शकत नाही, कारण जनतेला सर्वकाही लक्षात आलं आहे, असं राहुल गांधी म्हणाले.

हेही वाचा : Lok Sabha Election 2024 : मोदी सरकारचा फायदा फक्त 22 उद्योगपतींना, सोलापुरमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल

First Published on: April 24, 2024 7:56 PM
Exit mobile version