राजगृहाजवळील बेस्टचा बस थांबा हलवला

राजगृहाजवळील बेस्टचा बस थांबा हलवला

दादर हिंदु कॉलनी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असलेल्या राजगृहावरील मालमत्तेची काही अज्ञातांनी तोडफोड केल्यानंतर याचे तीव्र पडसाद सर्व राज्यात उमटले असतानाच राजगृहाजवळील बेस्ट बस थांबा सुरक्षेच्या कारणास्तव गुरुवारी काढून टाकण्यात आला आहे. या बस थांब्याच्या आडून त्याचा दुरुपयोग होत असल्याने हा थांबा हटवण्यात आला आहे.

राजगृहाच्या मुख्य प्रवेशद्वाराला लागून बस थांबा आहे. या बस थांब्यावरून अनेक प्रवाशी ये-जा करतात. त्यामुळे याच संधीचा फायदा उठवून या बस थांब्याचा आडोसा घेवून काही अज्ञातांनी हे कृत्य केले असावे. या बस थांब्याचा दुरुपयोग करून राजगृह सारख्या श्रद्धा स्थानाच्या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार करण्यासाठी आडोसा घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे राजगृहाच्या सुरक्षेसाठी हा थांबा त्वरीत अन्यत्र स्थलांतरीत करण्यात यावा, अशी मागणी होत होती. ही बाब लक्षात घेता स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी बेस्टचे महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे यांना हा बस थांबा त्वरीत काढून अन्यत्र हलवण्याची सूचना बुधवारी केली. त्यानुसार गुरुवारी येथील बस थांबा काढण्यात आला आहे. हा बस थांबा पुढील बाजूस स्थलांतरीत करण्यात आला आहे.

राजगृहाला २४ तास पोलीस बंदोबस्त

‘राजगृह’ च्या वास्तूची अज्ञातांनी तोडफोड केल्याच्या वृत्तानंतर भायखळा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार यामिनी यशवंत जाधव यांनी ‘राजगृहाला’ भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. तसेच गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन याप्रकरणी कठोर कारवाईची मागणी केली. यानंतर आमदार यामिनी जाधव यांनी गृहमंत्री यांची भेट घेऊन या प्रकारची सखोल चौकशी करण्याची मागणी केली. तसेच ‘राजगृह’ या वास्तूला चोवीस तास पोलीस बंदोबस्त देण्याचे आदेश त्वरित निर्गमित करावेत, अशीही मागणी त्यांनी गृहमंत्र्यांकडे केली.


हेही वाचा – भारत कोरोनाची लस शोधण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार – पंतप्रधान


 

First Published on: July 9, 2020 7:01 PM
Exit mobile version