अतिरेक्यांचे उदात्तीकरण हे शहरी माओवादाचे धोरण – भैयाजी जोशी

अतिरेक्यांचे उदात्तीकरण हे शहरी माओवादाचे धोरण – भैयाजी जोशी

अतिरेक्यांचे उदात्तीकरण हे शहरी माओवादाचे धोरण – भैयाजी जोशी

‘स्वतःला बुद्धिजीवी दर्शवून समाजात संघर्ष उत्पन्न करणारे काही शक्ती-केंद्र दुर्दैवाने सक्रिय आहेत. ही मंडळी प्रसंगी न्यायव्यवस्थेवर, न्यायाधीशांवर आरोप करतानाही मागेपुढे पाहत नाहीत. विश्वविद्यालयात ‘भारत तेरे तुकडे होंगे’ ची नारेबाजी, अतिरेक्यांचे उदात्तीकरण हे शहरी माओवादाचेच एक धोरण आहे’, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह सुरेश उपाख्य भैयाजी जोशी यांनी आज केले. संघाच्या पनवेल, खांदेश्वर येथील विजयादशमी उत्सव भैयाजींच्या उपस्थितीत संपन्न झाला.

‘समाजसुधारणा मूल्याधिष्ठित आधारावरच होऊ शकते’

भैय्याजी जोशींनी मार्गदर्शन करताना शहरी माओवाद, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश, मतदानातील NOTAचा वापर ते शासकीय धोरणांपर्यंत प्रत्येक मुद्द्याला स्पर्श केला. तसेच समाजमनाला प्रभावित करणाऱ्या कला, साहित्य, चित्रपट, राजकारण, क्रीडा, उद्योग, समाजसेवक इत्यादी क्षेत्रांत कार्यरत असणाऱ्या बुद्धीजीवींना दृष्टिकोन देण्याची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले. हिंदू समाजाची शक्ती विध्वंसक नसून ती रचनात्मक आहे. या देशातील सर्व संतांनी परहिताचाच संदेश दिलेला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या बहुचर्चित निर्णयांविषयी बोलताना भैय्याजी म्हणाले, “कायद्याच्या दृष्टीने योग्य असणाऱ्या बाबी समाजात मूल्यांवर प्रस्थापित नसतील तर समाजमनात संभ्रमाची स्थिती निर्माण होते. कायदा समाजाचा रक्षण करतो पण समाजसुधारणा मात्र मूल्याधिष्ठित आधारावरच होऊ शकते.”

‘केवळ प्रश्न विचारुन नकारात्मक वातावरण निर्माण करु नये’

भैय्याजी त्यापुढे म्हणाले, “जगभरात अस्तित्वात असलेल्या सर्व शासनव्यवस्थांमध्ये लोकशाही ही सर्वोत्तम व्यवस्था आहे. परंतु ती जिवंत राहण्याकरिता समाजातील प्रत्येक व्यक्ती जागरूक असणे गरजेचे आहे. लोकशाहीत ‘सर्वजण वाईट आहेत’ असे म्हणून चालू शकत नाही. उपलब्ध पर्यायांपैकी योग्य वाटणाऱ्या व्यक्तीस मतदान केले पाहिजे. ‘NOTA’ चा पर्याय निवडणे हे अप्रत्यक्षपणे ‘सर्व वाईट आहेत’ ह्या विचाराचे समर्थन करण्यासारखे आहे. जे लोकशाही साठी पूरक नाही.” समारोपाकडे वळताना भैय्याजी म्हणाले, “परिश्रमाने धनप्राप्ती करणे चांगली गोष्ट आहे. त्याचा समाजाच्या उत्थानासाठी उपयोग व्हायला हवा. म्हणून केवळ प्रश्न उपस्थित करत नकारात्मक वातावरण निर्माण न करता, समाजजीवनातील कला, क्रीडा, राजकारण, सामाजिक, उद्योग अशी प्रभावी क्षेत्र संस्कार आणि विकास दोन्ही देऊ शकतात. सर्व प्रबुद्धजनांनी एकत्रित येऊन राष्ट्रहितासाठी रचनात्मक कार्य करीत रहावे .”

हेही वाचा – ते संशयित अतिरेकी आमचे सदस्य नाहीत; सनातनचे घुमजाव
First Published on: October 18, 2018 9:50 PM
Exit mobile version