शिंदे गटात जाण्यासाठी गुवाहाटीच्या हॉटेलबाहेर तळ ठोकण्याची भास्कर जाधवांची होती तयारी?

शिंदे गटात जाण्यासाठी गुवाहाटीच्या हॉटेलबाहेर तळ ठोकण्याची भास्कर जाधवांची होती तयारी?

मुंबई : गेल्या वर्षी जूनमध्ये शिवसेनेत एकनाथ शिंदेंसह (Eknath Shinde) काही आमदारांनी बंडाचा झेंडा फडकावला. हे आमदार गुवाहाटीच्या एका हॉटेलमध्ये मुक्कामी होते. त्यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव (MLA Bhaskar Jadhav) यांनी देखील शिंदे गटात सामील होण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. अगदी गुवाहाटीच्या हॉटेलबाहेर तळ ठोकून बसण्याची तयारी देखील केली होती. पण शिंदेंसह अन्य आमदारांचा भास्कर जाधवांना विरोध होता, असा दावा एका भाजपा नेत्याने केला आहे.

राज्यात जून 2022मध्ये विधान परिषद निवडणूक झाल्यानंतर अतिशय वेगाने नाट्यमय घडामोडी घडल्या. विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह काही आमदार गुजरातच्या सुरतमधील एका हॉटेलमध्ये राहिले आणि त्यांनी बंडाचा झेंडा फडकावला. त्यानंतर ते आसाममधील गुवाहाटीच्या रेडिसन ब्लू हॉटेलमध्ये (Radisson Blu Hotel Guwahati) गेले. तोपर्यंत एकनाथ शिंदे यांना शिवसेनेतील 39 आमदारांचे समर्थन मिळाले होते. यासर्वांनी नंतर सांगितले की, आम्ही केलेले बंड नसून उठाव होता.

याचदरम्यान सध्या ठाकरे गटातील आक्रमक नेते म्हणून ओळखले जाणारे भास्कर जाधव यांनी विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अन्य आमदारांना जवळपास 100 वेळा फोन केले होते. त्यांनाही शिंदे गटात सामील व्हायचे होते. पण इतर आमदारांबरोबरच खुद्द एकनाथ शिंदे यांनी भास्कर जाधव यांना नकार दिला होता. कारण ते विश्वास ठेवण्याजोगे नाहीत, असे सर्वांचे मत होते, असा दावा भाजपा नेते मोहित कंबोज यांनी केला आहे.

आपण स्वत: तिकीट काढून गुवाहाटीत रेडिसन ब्लू हॉटेलमध्ये येतो आणि जोपर्यंत तुम्ही मला आपल्या गटात घेणार नाहीत, तोपर्यंत जाणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली होती. त्यांच्यासमवेत आमदार सुनील राऊत देखील होते, असे सांगून मोहित कंबोज म्हणाले की, भास्कर जाधव यांनी फोनवरून उद्धव ठाकरे तसेच आदित्य ठाकरे यांच्याविरोधातील तक्रारींचा पाढाही वाचला होता.

हेही वाचा – वलसाडमध्ये भीषण आग, स्फोटाच्या आवाजाने इमारतही कोसळली

First Published on: February 28, 2023 9:16 AM
Exit mobile version