वलसाडमध्ये भीषण आग, स्फोटाच्या आवाजाने इमारतही कोसळली

Fire in Valsad | बचावकार्य सुरू असून मृतांचा आकडा वाढणार असल्याचं सांगितलं जात आहे.

valsad fire

Fire in Valsad | वलसाड – गेल्या काही दिवसांपासून कंपन्यांना आगी लागण्याचे सत्र सुरू असतानाच गुजरातच्या वलसाड जिल्ह्यातील G.I.D.C.मध्ये भीषण आग लागली. G.I.D.C.मधील वेन पेट्रोकेम अॅण्ड फार्मा कंपनीत मध्यरात्री बॉयलरचा स्फोट झाला. या स्फोटामुळे भीषण आग लागली. तसंच, स्फोटामुळे संपूर्ण तीन मजली इमारत कोसळली आहे. या दुर्घटनेत तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून दोघेजण जखमी आहे. दरम्यान, आगीचे वृत्त समजताच अग्नीशमन दलाच्या सात गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या.

हेही वाचा – अहमदनगरमध्ये साखर कारखान्याला भीषण आग; अनेक कामगार अडकल्याची भीती

गुजरातमधील वलसाड जिल्ह्यात सारिगम जीआयडीसी आहे. या जीआयडीसीमध्ये अनेक रासायनिक कंपन्या आहेत. त्यापैकी वेन पेट्रोकेम अँड फार्मा (इंडिया) प्रा. कंपनीत सोमवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. कंपनीतील बॉयलरचा अचानक स्फोट झाल्याने ही आग लागली. स्फोटाची तीव्रता इतकी भीषण होती की स्फोटाच्या आवाजाने तीन मजली इमारत कोसळली. पहाटे चार वाजेपर्यंत इमारतीच्या ढिगाऱ्याखालून तीन मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. मृतांची ओळख अद्याप पटलेली नसून स्फोटाचं कारणही समोर आलेलं नाही. बचावकार्य सुरू असून मृतांचा आकडा वाढणार असल्याचं सांगितलं जात आहे.

घटनेची माहिती मिळताच आम्ही घटनास्थळी दाखल झालो. आतापर्यंत तीन जणांना बाहेर काढण्यात आलं असून दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आम्ही येथे पोहोचलो तेव्हा येथे सुरक्षारक्षा तैनात करण्यात आली नव्हती. तसंच, कोणत्या रसायनामुळे येथे आग लागली हे कळू न शकल्याने आम्ही तत्काळ आग विझवण्याचं काम करू शकलो नाही, अशी माहिती अग्नीशमन दलातील राहुल मुरारी यांनी दिली.