भूषण गगराणी यांची उचलबांगडी; आशिष सिंग सीएमओत

भूषण गगराणी यांची उचलबांगडी; आशिष सिंग सीएमओत

भूषण गगराणी

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती म्हणून ओळखले जाणारे सनदी अधिकारी भूषण गगराणी यांना मुख्यमंत्री कार्यालयातून कार्यमुक्त करण्यात आले आहे. गगराणी यांच्याकडे असलेला उद्योग विभागाचा कार्यभारही काढून घेण्यात आला असून त्यांचा पदभार प्रधान सचिव आशिष सिंग यांच्याकडे देण्यात आला आहे. गगराणी यांना तडकाफडकी हटविण्यात आल्याने प्रशासकीय वर्तुळात मात्र, आश्चर्य व्यक्त होत आहे. मुख्यमंत्री कार्यालयातून कार्यमुक्त करण्यात आल्यानंतर गगराणी हे १४ फेब्रुवारी ते २४ फेब्रुवारी, असे दहा दिवस रजेवर गेले होते. रजा संपवून परत आल्यानंतरही गगराणी यांची नव्या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली नाही. ते अद्याप नियुक्तीच्या प्रतीक्षेत असल्याचे समोर आले आहे.

फडणवीस यांच्या मर्जीतील अनेकांच्या बदल्या

उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर प्रशासनात महत्त्वाचे फेरबदल केले आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतील अनेक सनदी अधिकाऱ्यांच्या ठाकरे यांनी अन्यत्र बदल्या केल्या आहेत. मात्र, ठाकरे यांनी गगराणी यांना प्रधान सचिव म्हणून कायम ठेवले होते. मध्यंतरी फडणवीस यांच्या मर्जीतील अधिकाऱ्यांची इतरत्र बदली करावी, अशी मागणी मंत्र्यांनी केली होती. कारण या अधिकाऱ्यांना न हटविल्यास आघाडी सरकारमधील प्रत्येक बारीकसारीक माहिती विरोधकांपर्यंत पोहचेल, अशी भीती काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी व्यक्त केली होती. सध्या तशी माहिती विरोधकांना दिली जात असल्याचा काही मंत्र्यांचा दावा आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ बैठकीत अधिकारी कर्मचाऱ्यांना बाहेर काढून संवेदनशील विषयावर चर्चा केली जाते.

गगराणी यांच्याविषयी थोडक्यात

यापार्श्वभूमीवर गगराणी यांना मुख्यमंत्री कार्यालयातून हटविण्यात आल्याचे बोलले जाते. गगराणी हे १९९० च्या तुकडीतील आयएएस अधिकारी आहेत. मे २०१८ मध्ये फडणवीस यांनी त्यांना प्रधान सचिव म्हणून नेमले होते. तत्पूर्वी गगराणी हे महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ, सिडकोत कार्यरत होते.


हेही वाचा – सत्तेत असताना सावरकरांना भारतरत्न का दिला नाही? सेना-राष्ट्रवादीचा सवाल


 

First Published on: February 26, 2020 8:30 PM
Exit mobile version