गणरायाच्या मोठ्या मूर्ती महागणार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे आर्थिक गणित कोलमडणार

गणरायाच्या मोठ्या मूर्ती महागणार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे आर्थिक गणित कोलमडणार

गणेशोत्सवावरील निर्बंध आणि पीओपीच्या वापराबाबत अस्पष्टता, त्यातच महापालिकेकडून मंडपासाठी परवानगी मिळण्यास विलंब होत असल्याने गणेश मूर्तिकारांकडून मूर्ती साकारण्यास उशिराने सुरुवात झाली. त्यातच पीओपीच्या वाढत्या किमती यामुळे सार्वजनिक मंडळांच्या मोठ्या मूर्ती यंदा महागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे आर्थिक गणित यंदा कोलमडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

गणेशोत्सवावरील निर्बंध, पीओपी वापराबाबत अनिश्चितता यामुळे यंदा मुंबईतील गणेश मूर्तिकारांमध्ये मोठ्या मूर्ती साकारण्याबाबत संभ्रम होता, मात्र गणेशोत्सवाला दोन महिने असताना शिंदे सरकारने उठवलेले निर्बंध आणि यंदासाठी पीओपी वापरासाठी दिलेली परवानगी यामुळे मुंबईतील गणेश मूर्तिकार तातडीने कामाला लागले, मात्र मुंबई महापालिकेकडून मंडपासाठी आवश्यक असलेली परवानगी मिळण्यास होत असलेल्या विलंबाचा फटका मूर्तिकारांना बसत आहे.

गणेशोत्सवासाठी ४० दिवस शिल्लक राहिले असतानाही मंडप परवानगीसाठी मूर्तिकारांना महापालिकेत फेर्‍या माराव्या लागत आहेत, तर दुसरीकडे पीओपी आणि रंगाच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. तसेच गणेशोत्सवाबाबत असलेल्या संभ्रमामुळे परराज्यातून येणारे मूर्तिकार व कलाकार यंदा फारच कमी प्रमाणात मुंबईत आले आहेत. परिणामी मूर्ती साकारण्यासाठी आवश्यक असलेले कामगारांची कमतरता आणि वाढलेल्या किमतीचा परिणाम गणेशांच्या मोठ्या मूर्तीवर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

गतवर्षी १० ते १२ फुटांपर्यंतची मूर्तीची किंमत एक ते सव्वा लाखांपर्यंत होती. ती वाढलेल्या पीओपी व रंगाच्या किमतीमुळे यंदा साधारणत: दोन ते अडीच लाखांपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे मुंबईतील मूर्तिकारांनी मोजक्या मूर्ती साकारण्याचा निर्णय घेतला आहे. याचा फटका मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना बसण्याची शक्यता आहे. मुंबईतील सुप्रसिद्ध मूर्तिकार राजू शिंदे हे दरवर्षी १५० मोठ्या गणेशमूर्ती साकारतात, त्यांनी यंदा अवघ्या ५० मूर्तीच साकारण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचप्रमाणे रेश्मा खातू यांनीही मोजक्याच १५ मोठ्या गणेशमूर्ती साकारण्याचा निर्णय घेतला आहे. मूर्तीच्या वाढलेल्या किमती आणि मूर्तिकारांनी मूर्ती कमी बनवण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे गणेशोत्सव मंडळांना मोठ्या मूर्तींसाठी अधिक रक्कम मोजावी लागणार आहे. यामुळे यंदा गणेशोत्सव मंडळाचे आर्थिक गणित कोलमडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पालिकेकडून परवानगी मिळण्यास झालेल्या उशिरामुळे आता वेळ फार कमी राहिला आहे. तसेच निर्बंधांमुळे असलेल्या संभ्रमामुळे कामाला सुरुवात करण्यात आली नव्हती. त्यामुळे कामागारही उपलब्ध नसल्याने मूर्ती मोजक्याच बनवण्याचा निर्णय घेतला आहे.
– रेश्मा खातू, मूर्तिकार

पीओपी व रंगाच्या वाढलेल्या किमतीमुळे यंदा गणेशमूर्तींच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे. गतवर्षी १० ते १२ फुटांच्या गणेशमूर्ती या एक ते सव्वा लाखांपर्यंत होत्या. त्या यंदा दोन लाखांपर्यंत पोहचल्या आहेत. तसेच परराज्यातील कामगारांचा तुटवडा यामुळे मोजक्याच मूर्ती बनवण्याचा निर्णय घेतला आहे.
– राजू शिंदे, मूर्तिकार

First Published on: July 28, 2022 5:11 AM
Exit mobile version